नजिकच्या काळात न्यूझीलंडलाही ‘चिनी वादळाला’ तोंड द्यावे लागेल – न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

नजिकच्या काळात न्यूझीलंडलाही ‘चिनी वादळाला’ तोंड द्यावे लागेल – न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

वेलिंग्टन/बीजिंग – ‘ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंधांमध्ये सध्या जो काही तणाव आहे, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही. ऑस्ट्रेलिया चीनकडून येणार्‍या वादळाच्या टप्प्यात आहे किंवा त्या वादळात सापडला आहे, असेही म्हणता येईल. तसे असेल, तर न्यूझीलंडलाही नजिकच्या काळात चिनी वादळाला तोंड द्यावे लागू शकते’, असा इशारा न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्री नानिआ माहुता यांनी दिला. परराष्ट्रमंत्री माहुता यांच्या या वक्तव्यावर चीनकडून प्रतिक्रिया उमटली असून, न्यूझीलंडने लक्ष विचलित करणार्‍या गोष्टींपासून दूर रहावे व धोरणात्मक भागीदारी घट्ट करण्यावर भर द्यावा, असे चीनने बजावले आहे.

चिनी वादळ

चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतो. त्याबरोबरच चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रभाव वाढविण्यात आला असून त्या जोरावर हस्तक्षेपही सुरू झाला आहे. हा हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व सरकारने आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. मॉरिसन सरकारकडून सुरू असणार्‍या कारवाईमुळे चीन प्रचंड अस्वस्थ झाला असून आपल्या आर्थिक व व्यापारी ताकदीचा वापर करून ऑस्ट्रेलियावर दडपण टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. चीनने ऑस्ट्रेलियातून आयात होणार्‍या अनेक उत्पादनांवर वाढीव कर लादले असून काहींवर अघोषित बंदीही घातली आहे. चीनने ऑस्ट्रेलियन मंत्र्यांबरोबरील संवादही बंद केला आहे.

चिनी वादळ

ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंड व चीनमधील संबंधांमध्येही तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. 2018 साली न्यूझीलंडनचे चीनच्या ‘हुवेई’ कंपनीवर बंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिबेट, तैवान, हाँगकाँगमधील कायदा तसेच झिंजिआंगमधील उघुरवंशियांवर होणारे अत्याचार या मुद्यावर न्यूझीलंडने चीनच्या विरोधात भूमिका घेतली होती. ऑस्ट्रेलियाने या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर चीनने आर्थिक व व्यापारी पातळीवर फटके देण्यास सुरुवात केली होती. या पार्श्‍वभूमीची जाणीव ठेऊन न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इशारा दिल्याचे दिसत आहे.

यावेळी त्यांनी न्यूझीलंडमधील उद्योगक्षेत्राला चीनव्यतिरिक्त इतर बाजारपेठांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. चीनबरोबर मोठा वाद झाला तर त्याला तोंड देण्यासाठी तयारी सुरू करा, असा स्पष्ट संदेशही परराष्ट्रमंत्री माहुता यांनी यावेळी दिला. न्यूझीलंड व चीनमधील द्विपक्षीय व्यापार 21 अब्ज डॉलर्स असून चीन हा न्यूझीलंडचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. न्यूझीलंडच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 30 टक्के निर्यात चीनमध्ये होते. काही महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडने चीनबरोबरील मुक्त व्यापार कराराची मुदत 10 वर्षांनी वाढविण्यासही मान्यता दिली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info