अमेरिकेबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून ‘न्यूक्लिअर ट्रेन’ सुरू करण्याच्या हालचाली

अमेरिकेबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून ‘न्यूक्लिअर ट्रेन’ सुरू करण्याच्या हालचाली

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिका व नाटोबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियात पुन्हा एकदा ‘न्यूक्लिअर ट्रेन’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रशियातील लष्करी विश्‍लेषकांनी याबाबत संकेत दिले आहेत. यापूर्वी रशिया व अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या काळात रशियाने ‘रेल्वे मिसाईल नेटवर्क’ सक्रिय केले होते. अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांच्या उपग्रह यंत्रणांना चकवा देऊन देशाच्या कानाकोपर्‍यात अण्वस्त्रांची वाहतूक करता यावी, यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१९ साली रशिया व अमेरिकेदरम्यानच्या ‘आयएनएफ ट्रिटी’तून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुढील महिन्यात ‘न्यू स्टार्ट’ कराराची मुदतही संपणार आहे. हे दोन्ही करार अमेरिका व रशियातील अण्वस्त्रे तसेच प्रगत क्षेपणास्त्रांच्या नियंत्रणासाठी महत्त्वाचे मानले जातात. ते संपुष्टात येत असल्याने अमेरिका व रशियाकडून अण्वस्त्रे तसेच प्रगत क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी दोन्ही देशांनी काही प्रगत क्षेपणास्त्रांच्या तसेच अण्वस्त्रांच्या चाचण्या घेतल्याचेही समोर आले आहे.

रशियाने आपल्या आण्विक धोरणातही मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. रशियाच्या नव्या आण्विक धोरणानुसार, अण्वस्त्र हल्ल्याव्यतिरिक्त क्षेपणास्त्र हल्ल्याला देखील अण्वस्त्र हल्ल्याप्रमाणे प्रत्युत्तर दिले जाणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. अमेरिकेने आण्विक धोरणात केलेले बदल तसेच जगभरातील बदलत्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रशियाला हे बदल करावे लागल्याचे रशियाकडून सांगण्यात येते. ‘न्यूक्लिअर ट्रेन’ पुन्हा सुरू करणेही अशाच स्वरुपाच्या बदलांचा भाग मानला जात आहे.

यापूर्वी १९८०च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत रशियाने ‘न्यूक्लिअर रेल्वे नेटवर्क’ विकसित केले होते. रेल्वेतून वाहतूक करता यावी, यासाठी रशियाने ‘आरटी-२३ मोलोडेट्स’ नावाने स्वतंत्र आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित केले होते. या क्षेपणास्त्रांची वाहतूक करण्यासाठी १२ स्वतंत्र ट्रेन्स विकसित करण्यात आल्या होत्या. रशियातील वेगवेगळ्या भागात २०० ‘फायरिंग पॉईंट्स’देखील उभारण्यात आले होते. रशियन लष्कराच्या तीन वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये ‘न्यूक्लिअर ट्रेन्स’ तैनात करण्यात आल्या होत्या.

१९८७ ते २००२ अशी १५ वर्षे या ‘न्यूक्लिअर ट्रेन्स’ रशियन लष्करात सक्रिय होत्या. या ट्रेन्सचा माग अमेरिकेलाही काढता आला नव्हता, असा दावा रशियाकडून करण्यात आला होता. अमेरिकेबरोबरील ‘स्टार्ट ट्रिटी’च्या पार्श्‍वभूमीवर या ‘न्यूक्लिअर ट्रेन्स’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर २०१५ सालच्या सुमारास रशियाने पुन्हा एकदा हे नेटवर्क सक्रिय करण्याचे संकेत दिले होते. अपुर्‍या निधीमुळे सदर योजना स्थगित केल्याचे २०१८ साली स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र गेल्या वर्षभरात नवी अण्वस्त्रे व हायपरसोनिक मिसाईल्स विकसित करून त्याच्या चाचण्यांचा धडाकाा लावणार्‍या रशियाने पुन्हा एकदा ‘न्यूक्लिअर ट्रेन्स’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रशियातील आघाडीचे लष्करी विश्‍लेषक अ‍ॅलेक्सी लिऑनकोव्ह व व्लादिमिर एव्हसीव्ह यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. येत्या तीन ते पाच वर्षात हे नेटवर्क पूर्णपणे सक्रिय होऊ शकते, असे एव्हसीव्ह यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. रशियाच्या सीमांनजिक नाटोच्या लष्करी हालचाली वाढत असताना ‘न्यूक्लिअर ट्रेन नेटवर्क’ हे त्याला प्रभावी उत्तर ठरेल, असेही रशियन विश्‍लेषकांनी बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info