कोरोनाची अखेर होण्याऐवजी जग त्यापासून अधिकच दूर चालले आहे – जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशारा

कोरोनाची अखेर

जीनिव्हा/वॉशिंग्टन – ‘कोरोनाच्या साथीची अखेर होण्याच्या क्षणापासून जग अधिकाधिक दूर होत चालले आहे. सध्या आपण अत्यंत वाईट परिस्थितीत आहोत आणि संपूर्ण जगाला या वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे’, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेत (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) साथीच्या रोगांच्या विशेषज्ञ असणर्‍या डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी दिला. केर्खोव्ह यांच्या या इशार्‍याला इतर तज्ज्ञांकडूनही दुजोरा मिळत आहे. अमेरिकेतील वैद्यक तज्ज्ञ व ‘एफडीए’चे माजी प्रमुख डॉक्टर स्कॉट गॉटिलेब यांनी देश ‘डेल्टा व्हेरिअंट’च्या वाढत्या प्रसाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बजावले आहे. ब्रिटीश सरकारने घेतलेल्या ‘अनलॉक’च्या निर्णयावरही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आक्षेप घेतले असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन जगाचे आरोग्य धोक्यात घालीत आहेत, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात सुमारे 19 कोटी कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या 40 लाखांवर गेली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवे ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/instead-of-being-the-end-of-the-corona-the-world-is-moving-further-away-from-it/