जेरूसलेम – ‘इराण जल्लादाच्या हाताखाली गेला असून इब्राहिम रईसी यांचे नेतृत्व जगासाठी घातक व या क्षेत्रासाठी विध्वंसक आणि इस्रायलच्या अस्तित्त्वासाठी धोकादायक ठरेल’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतून प्रवास करणार्या जहाजांवर ड्रोन्सचे हल्ले चढविणार्या इराणविरोधात कारवाई करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आवाहन संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केले. इब्राहिम रईसी यांनी मंगळवारी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हा इशारा दिला.
इराणमध्ये जून महिन्यात पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत रईसी यांना सर्वाधिक मते मिळाली. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे हस्तक म्हणून रईसी यांच्याकडे पाहिले जाते. इराणच्या राजकारणावर पकड असलेले आयातुल्ला खामेनी यापुढे रईसी यांच्यामार्फत अधिक आक्रमक व जहाल धोरणे स्वीकारतील, असा दावा केला जातो. येत्या काळात इराणच्या धोरणात मोठे बदल झालेले दिसतील, असे पाश्चिमात्य विश्लेषकांचे म्हणणे आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी देखील अमेरिका व युरोपिय देशांना यासंबंधी बजावले.
सार्या जगासाठी धोका दूर करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आवाहन संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून सागरी क्षेत्रात इराणची वाढलेली आक्रमकता याकडे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय जहाजांवर पाच वेळा ड्रोन हल्ले झाले असून यामागे इराण असल्याचे गांत्झ म्हणाले. ‘ड्रोन्सनी सौदी अरेबियाच्या इंधन प्रकल्पांवरही हल्ले चढविले. तर काही दिवसांपूर्वी दोघांचा बळी घेणारा मर्सर स्ट्रीट या इंधनवाहू जहाजावरील ड्रोन हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे’, अशी टीका संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केली.
‘इराणचे हे हल्ले रोखण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण इराणच्या वाढत्या लष्करी हालचाली या क्षेत्राती शस्त्रस्पर्धा भडकविणार्या आणि आखातातील अस्थैर्य वाढविणार्या ठरतील’, असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बजावले. इराणचा हा धोका मोडून काढण्यासाठी इस्रायलकडे वेगवेगळी साधने असून त्याचा वापर केला जाईल, असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला.
दरम्यान, येत्या गुरुवारी रईसी यांचा शपथग्रहण होणार आहे. त्यानंतर अमेरिका व युरोपिय देशांच्या निर्बंधांची पर्वा करणार नसल्याचे इराणचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी मंगळवारी पत्रकारांसमोर जाहीर केले. रईसी यांची ही भूमिका इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी उत्सुक असलेल्या अमेरिका व युरोपिय देशांसाठी धक्का ठरू शकते, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |