अफगाणिस्तानच्या पंजशीरमधील संघर्षात तालिबानच्या वरिष्ठ कमांडरची कोंडी

काबुल – अफगाणिस्तानच्या पंजशीरमधील संघर्षात तालिबानच्या वरिष्ठ कमांडर कारी फसिह सलाहुद्दीनची कोंडी केल्याचे नॉर्दन अलायन्सने जाहीर केले. कारी फसिहच्या मागे आपले जवान असून लवकरच त्याला जिवंत पकडण्यात येईल किंवा ठार केले जाईल, अशी माहिती नॉर्दन अलायन्सने दिली. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी देखील याला दुजोरा दिला. दरम्यान, नॉर्दन अलायन्सने चर्चेत सामील व्हावे, असे आवाहन तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने केले आहे.

कोंडी

पंजशीरच्या खोऱ्यांमध्ये नॉर्दन अलायन्स आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. या खोऱ्यांमध्ये नॉर्दन अलायन्सच्या जवानांनी तालिबानच्या दहशतवाद्यांची कोंडी केली आहे. टेकड्यांवर बसलेले नॉर्दन अलायन्सचे जवान तालिबानच्या वाहनांवर गोळ्यांचा वर्षाव करीत आहेत. आत्तापर्यंतच्या या संघर्षामध्ये तालिबानचे 300 ते 800 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो. तालिबानने याबाबत काही उघड केलेले नाही.

तर सलांगच्या खोऱ्यांमध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांचे नेतृत्व करणारा वरिष्ठ कमांडर कारी फसिह सलाहुद्दीन यालाच कोंडीत पकडल्याची माहिती नॉर्दन अलायन्सने दिली. कारी फसिह हा पळ काढण्याच्या तयारीत आहे. पण त्याला जिवंत पकडण्यात येईल किंवा ठार करण्यात येईल, असे नॉर्दन अलायन्सने जाहीर केले. तर पंजशीरच्या खोऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने आलेले तालिबानचे दहशतवादी नॉर्दन अलायन्सच्या हल्ल्यांमध्ये कोंडीत सापडल्याचे माजी उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी जाहीर केले. नॉर्दन अलायन्सच्या जवानांनी सलांगच्या महामार्गाचा ताबा घेतल्याचे सालेह म्हणाले.

कोंडी

पंजशीर आणि सलांगच्या खोऱ्यातील या कारवाईच्या काही तासआधी उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी तालिबानच्या क्रूर आणि अमानवी कारवाईची माहिती दिली होती. अंद्राबच्या खोऱ्यात नॉर्दन अलायन्सच्या हल्ल्यांसमोर हतबल ठरत असलेले तालिबानचे दहशतवादी मुलांचे आणि वृद्धांचे अपहरण करीत असल्याचा आरोप सालेह यांनी केला होता. मुले आणि वृद्धांचा मानवी ढालीसारखा वापर करून तालिबान मानवाधिकारांचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका सालेह यांनी ठेवला.

गेल्या तीन दिवसांच्या संघर्षात नॉर्दन अलायन्सला आघाडी मिळत असल्याचा दावा केला जातो. त्यातच तालिबानविरोधी सशस्त्र टोळ्या पंजशीरमध्ये दाखल होत असल्याच्या बातम्या येत आहेत. पंजशीरमध्ये सुरू असलेल्या या संघर्षावर तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने प्रतिक्रिया देताना, नॉर्दन अलायन्सला चर्चेचे आवाहन केले. पण तालिबानसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा शक्य नसल्याचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह आणि नॉर्दन अलायन्सचे नेते अहमद मसूद यांनी आधीच ठणकावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info