Breaking News

आर्मेनिया व अझरबैजानमध्ये युद्ध भडकण्याचे संकेत

बाकु/येरेवान – आर्मेनिया व अझरबैजान या मध्य आशियातील देशांमध्ये रविवारपासून जबरदस्त संघर्ष पेटला असून युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी मार्शल लॉची घोषणा केली असून परस्परांवर संघर्ष सुरू केल्याचे आरोप केले आहेत. रविवारच्या संघर्षात दोन्ही बाजूंची मोठी जीवितहानी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तुर्कीने अझरबैजानला लष्करी व इतर सहाय्य देण्याची घोषणा केली असून आर्मेनिया अस्थैर्याचे कारण असल्याचा आरोप केला आहे. तुर्कीने अझरबैजानमध्ये लढाऊ विमाने व सीरियन बंडखोरांची पथके पाठविल्याचे दावेही समोर आले आहेत.

आर्मेनिया

दोन महिन्यांपूर्वी आर्मेनिया व अझरबैजानमध्ये भडकलेल्या संघर्षात १६ जवानांचा बळी गेला होता. त्यावेळी अझरबैजानने आर्मेनियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला चढवण्याची धमकीही दिली होती. तेव्हापासून दोन देशांमधील तणाव कायम असून छोट्यामोठ्या चकमकी उडाल्याचेही सांगण्यात येते. मात्र रविवारी मोठा संघर्ष पेटल्याचे समोर आले आहे.

सोव्हिएत रशियातून बाहेर पडल्यापासून अझरबैजान व आर्मेनिया यांच्यातील सीमावाद कायम राहिला आहे. ‘नागोर्नो-कॅराबख’ या स्वायत्त प्रांतावरून हा वाद असून सध्या हा भाग अझरबैजानचा हिस्सा आहे. मात्र या प्रांतात आर्मेनियन वंशाच्या नागरिकांची संख्या मोठी असून प्रांताचा काही भाग आर्मेनियाने ताब्यात घेतला आहे. गेल्या तीन दशकात या दोन्ही मध्य आशियाई देशांच्या सीमेवर गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या होत्या. पण चार वर्षांपासून या दोन्ही शेजारी देशांच्या सीमेवरील तणाव अधिकच वाढत चालला आहे.

आर्मेनियागेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा या दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य तैनाती वाढविली असून एकमेकांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी या तणावाचे रूपांतर संघर्षात झाले. यानंतर अझरबैजान आणि आर्मेनियाने आपल्या सीमेजवळ क्षेपणास्त्रे, रणगाडे, तोफा व ड्रोन्स तैनात केले आहेत. आर्मेनियाने अझरबैजानवर संघर्ष भडकविल्याचा आरोप करून त्यांची हेलिकॉप्टर्स व ड्रोन्स पाडल्याचा दावाही केला आहे. मात्र अझरबैजानने आपली हानी झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. त्याचवेळी गेले तीन दशके सुरू असलेला संघर्ष कायमचा संपविण्याची वेळ आल्याचा इशारा देऊन संघर्ष अधिक भडकण्याचे संकेत दिले आहेत.

आर्मेनियाआर्मेनिया व अझरबैजानमध्ये भडकलेल्या या संघर्षात तुर्कीनेही उडी घेतली आहे. आर्मेनियावर संघर्ष भडकविल्याचा आरोप करून तुर्कीने या प्रकरणात आपण अझरबैजानच्या पाठीशी उभे असल्याचे जाहीर केले आहे. तुर्कीने आपली लढाऊ विमाने व सिरियन बंडखोरांच्या तुकड्या अझरबैजानमध्ये लढण्यासाठी धाडल्याचेही दावे समोर आले आहेत. रशियाने यापूर्वीच आर्मेनियाला आपले समर्थन असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आर्मेनिया-अझरबैजान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशिया व तुर्की आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info