युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी रशिया खोटी सबब तयार करीत आहे

- व्हाईट हाऊसचा आरोप

खोटी सबब

वॉशिंग्टन/मॉस्को – रशियन लष्कराला युक्रेनवर आक्रमणाची संधी मिळावी म्हणून रशिया खोटी सबब बनविण्याचे प्रयत्न करीत आहे आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना याची माहिती मिळाल्याचा आरोप व्हाईट हाऊसने केला आहे. रशियन यंत्रणांनी पूर्व युक्रेनमध्ये आधीच एजंट धाडले असून त्यांच्या माध्यमातून ‘फॉल्स-फ्लॅग ऑपरेशन’ घडविण्याची योजना असल्याचेही अमेरिकेने आरोपात म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही रशियाकडून हालचाली सुरू असल्याच्या आरोपाला दुजोरा दिला आहे.

‘अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना रशियाच्या हालचालींबाबत माहिती मिळाली आहे. युक्रेनकडून पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थक तुकड्यांवर हल्ला चढविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे चित्र उभे करण्यात येत आहे. त्यासाठी रशियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अपप्रचार सुरू केला आहे. शहरी भागांमध्ये संघर्ष करण्याचे प्रशिक्षण घेतलेले एजंट पूर्व युक्रेनमध्ये आधीच पाठविण्यात आले आहेत. रशियासमर्थक तुकड्यांविरोधात घातपात घडवून त्याचा दोष युक्रेनवर टाकण्यात येईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमणाचा निर्णय घेतल्यास याची अंमलबजावणी होईल’, असा आरोप व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी केला.

खोटी सबब

राजनैतिक वाटाघाटी अपयशी ठरल्यास रशिया युक्रेनवर आक्रमण करील व त्यात मोठ्या प्रमाणात युद्धगुन्हे तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. अमेरिकेला याबाबत तीव्र चिंता वाटत असल्याचेही साकी यांनी बजावले. व्हाईट हाउसच्या प्रवक्त्यांनी केलेल्या या आरोपांना इतर अधिकार्‍यांकडूनही दुजोरा मिळत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनीही, रशियन हालचालींबाबत अमेरिकेकडे ठोस माहिती असल्याचे म्हटले आहे. युक्रेन-रशिया सीमेनजिक होणारे संभाषण तसेच लोकांच्या हालचाली यावरून गुप्तचर यंत्रणाना माहिती मिळाल्याचे एक वरिष्ठ अमेरिकी अधिकार्‍याने म्हटले आहे.

खोटी सबब

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही यासंदर्भात पुष्टी केली आहे. ‘घातपात व माहितीच्या अपप्रचाराची योजना आखण्यात आली आहे. रशिया २०१४ सालात वापरलेल्या डावपेचांची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियन तुकड्यांवर हल्ला चढविला, असे चित्र उभे करून युक्रेनवर आक्रमण करण्याच्या हालचाली सुरू आहेत’, असे अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांनी बजावले. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणा तसेच अधिकार्‍यांनीही पूर्व युक्रेनमध्ये हालचाली सुरू असल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसात रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये झालेली चर्चा अपयशी ठरल्यानंतर रशियन हालचालींना अधिक वेग आल्याचे दिसत आहे. अमेरिका तसेच युक्रेनच्या यंत्रणांनी केलेल्या दाव्यांनुसार येत्या काही दिवसातच रशिया युक्रेनवर आक्रमण करु शकते. मात्र रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी, युक्रेनवरील आक्रमणाबाबत करण्यात आलेले सर्व दावे फेटाळले आहेत. रशियाने गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन सीमेनजिक जवळपास एक लाख जवान तैनात केले आहेत. त्याचवेळी शेजारी देश असणार्‍या बेलारुसमध्येही रशियन लष्कर तैनात असल्याचे सांगण्यात येते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info