लंडन/मॉस्को – रशियाकडून युक्रेनवर आक्रमण करण्याच्या हालचाली सुरू असून त्यापूर्वी रशियाने ‘न्यूक्लिअर स्टॅट्रेजिक एक्सरसाईज’ करण्याची तयारी सुरू केल्याचा इशारा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिला. वॉलेस यांच्या इशार्यापाठोपाठ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनीही रशियाला कठोर शब्दात खडसावल्याचे समोर आले आहे. पाश्चात्य देशांकडून देण्यात येणार्या या इशार्यांकडे दुर्लक्ष करीत रशियाने गुरुवारी बेलारुसबरोबर ‘युनियन रिझॉल्व्ह’ नावाच्या संयुक्त युद्धसरावाला सुरुवात केली आहे.
युक्रेनचा नाटोत समावेश झाल्यास ही गोष्ट रशिया व नाटोदरम्यान अणुयुद्धाचा भडका उडविणारी ठरेल आणि यात कोणीच जिंकणार नाही, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नुकताच दिला होता. हा इशारा देतानाच रशियाकडून युक्रेन सीमेवर मोठी संरक्षणतैनाती करण्यात आली आहेत. बेलारुसमध्येही युद्धसरावासाठी ३० हजार जवान पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. रशिया-युक्रेन व बेलारुस-युक्रेन अशा दोन सीमांवर रशियाने जवळपास दीड लाख जवान तैनात केल्याचे मानले जाते. या जवानांबरोबरच हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, प्रगत हवाई सुरक्षायंत्रणा, रणगाड, सशस्त्र वाहने तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमही तैनात करण्यात आली आहे.
रशियाची ही तैनाती व संभाव्य आक्रमण रोखण्यासाठी पाश्चात्य देशांनी राजनैतिक वाटाघाटींवर जोर दिला आहे. अमेरिका व नाटोची रशियाबरोबरील चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता फ्रान्स, ब्रिटन व जर्मनीने प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशियाचा दौरा केला. त्यापाठोपाठ गुरुवारी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस रशियात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेसदेखील रशियाला भेट देणार असून दोन देशांमध्ये ‘टू प्लस टू’ चर्चा पार पडणार आहे. या चर्चेपूर्वी संरक्षणमंत्री वॉलेस यांनी रशियाच्या हालचालींबाबत इशारा दिल्याने लक्ष वेधले गेले आहे.
‘रशिया चर्चा करीत असल्याचे दाखवित असली तरी त्यांची कृती वेगळ्याच दिशेने सुरू आहे. युक्रेन सीमेवर रशिया बटालियन ग्रुप्सच्या स्वरुपात तैनाती वाढवित आहे. लवकरच ते आण्विक सराव करण्याच्याही तयारीत आहेत’, असे ब्रिटीश संरक्षणमंत्र्यांनी बजावले. त्यांच्या इशार्यापाठोपाठ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही आक्रमक पवित्रा घेऊन युरोपच्या सुरक्षेवर गंभीर संकटाचे सावट असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस व रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्यातही जबरदस्त खडाजंगी उडाल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियाने शीतयुद्धाच्या काळाप्रमाणे वर्तन करणे थांबवावे व तैनाती मागे घ्यावी, असा इशारा ट्रुस यांनी दिला. तर, पाश्चात्य देशांनी आम्हाला उपदेशाचे डोस पाजू नये त्यातून काही निष्कर्ष निघणार नाही, असे प्रत्युत्तर परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी दिल्याचे समोर येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |