४२ रफायल लढाऊ विमानांसाठी इंडोनेशियाचा फ्रान्सबरोबर करार

जकार्ता – इंडोनेशियाने फ्रान्सबरोबर ४२ रफायल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी ही घोषणा केली. फ्रान्सकडून रफायल विमानांची खरेदी करणारा इंडोनेशिया हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील दुसरा देश ठरतो. याआधी भारताने फ्रान्सकडून ३६ रफायल विमानांची खरेदी केली होती.

४२ रफायल

भारताने रफायल विमानांची खरेदी केल्यानंतर फ्रान्सच्या डॅसॉल्ट कंपनीच्या विमानांची मागणी वाढल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इजिप्त, युएई तर युरोपमधील ग्रीस व क्रोएशिया या देशांनी फ्रान्सकडून रफायल विमानांची खरेदी केली. यांच्यानंतर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आणखी एक देश फ्रान्सबरोबर रफायल विमानांच्या खरेदीसाठी उत्सुक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण त्याचे तपशील समोर आले नव्हते.

गुरुवारी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी सोशल मीडियामधून इंडोनेशियाबरोबर झालेल्या कराराची माहिती उघड केली. ४२ रफायल विमानांसाठी इंडोनेशियाने ८.१ अब्ज डॉलर्सचा करार केल्याचे पार्ली यांनी सांगितले. इंडोनेशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने संरक्षणमंत्र्यांचा हवाला देऊन सहा रफायल विमानांचा खरेदी करार झाल्याचे सांगितले. तर येत्या काळात उर्वरित ३६ विमानांच्या खरेदीचा करार होईल, असे म्हटले आहे. यापुढेही इंडोनेशिया फ्रान्सकडून आणखी रफायल विमानांची खरेदी करू शकतो, असा दावा केला जातो. याशिवाय इंडोनेशियाने फ्रान्सकडून दोन स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडींच्या निर्मिती तसेच दारूगोळ्याच्या खरेदीसंबंधी देखील करार केले आहेत.

४२ रफायल

इंडोनेशियाच्या हवाईदलाकडे सध्या अमेरिकन बनावटीची एफ-१६ तर रशियाची सुखोई लढाऊ विमाने आहेत. या दोन्ही श्रेणीतील विमाने फार जुनी झाली असून इंडोनेशियाच्या हवाईदलाला प्रगत लढाऊ विमानांची आवश्यकता होती. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इंडोनेशियाला ३६ एफ-१५ विमानांची विक्री करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी अमेरिका व इंडोनेशियामध्ये जवळपास १४ अब्ज डॉलर्सचा करार होणार आहे. पण त्याआधी आपल्या हवाईदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी इंडोनेशियाने फ्रान्सबरोबर रफायल विमानांचा खरेदी करार केला आहे.

या करारासह फ्रान्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. गेल्या वर्षी अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने ऑकस करार केला होता. या सहकार्यासाठी ऑस्ट्रेलियाने फ्रान्सबरोबर केलेला आण्विक पाणबुडीच्या खरेदीचा करारही मोडीत काढला होता. यावर फ्रान्सने संताप व्यक्त केला होता. इंडोनेशियाने देखील या ऑकस करारावर चिंता व्यक्त केली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info