आंतरराष्ट्रीय समुदायाने लादलेल्या कठोर निर्बंधांचे भयावह परिणाम रशियाला भोगावे लागतील

- जी७ गटाचा इशारा

वॉशिंग्टन  – ‘युक्रेनच्या सीमेवरील रशियाची लष्करी जमवाजमव ही अत्यंत गंभीर बाब असून रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास आंतरराष्ट्रीय समुदाय कठोर आर्थिक निर्बंध लादेल. या निर्बंधांचे भयावह परिणाम रशियाला भोगावे लागतील’, असा इशारा ‘जी७’ गटाने दिला आहे. अमेरिका, ब्रिटन व नाटोने पुढील काही दिवसात कोणत्याही क्षणी रशिया युक्रेनवर आक्रमण करेल, असे बजावले आहे. या पार्श्‍वभूमीवर, ‘जी७’चा इशारा रशियावरील दडपण अधिक वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो.

जी७

सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या देशांचा गट असणार्‍या ‘जी७’ने रशिया-युक्रेन मुद्यावर स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात ‘जी७’ने आंतरराष्ट्रीय समुदाय रशियावर कठोर निर्बंध लादण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला. ‘जी-७चे प्राधान्य सध्या निर्माण झालेली तणावाची स्थिती निवळण्यासाठीच्या प्रयत्नांना सहाय्य करणे हीच आहे. पण तरीही रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर जी७ एकत्रितरित्या रशियावर कठोर आर्थिक व वित्तीय निर्बंध लादण्यासाठी सज्ज आहे. या निर्बधांचे रशियन अर्थव्यवस्थेवर भयावह परिणाम होतील’, असे जी७ने बजावले आहे.

जी७

रशियावर निर्बंध लादतानाच युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला आवश्यक अर्थसहाय्य पुरविण्यासही ‘जी७’ गटातील देश सज्ज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. या निवेदनापूर्वी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांचे एक वक्तव्यही समोर आले आहे. रशियावर निर्बंध लादण्याची वेळ आल्यास त्यासाठी लागणा किंमत मोजण्यास जर्मनी तयार आहे, असे जर्मन परराष्ट्रमंत्री ऍनालिना बेअरबॉक यांनी सांगितले होते. गेल्याच आठवड्यात अमेरिका, ब्रिटन व युरोपिय महासंघांमध्ये रशियावर टाकण्यात येणार्‍या निर्बंधांच्या आराखड्यावर एकमत झाले असल्याचेही सांगण्यात येते.

अमेरिकेसह युरोपिय देशांनी यापूर्वीही रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. रशियाने २०१४ साली युक्रेनवर केलेला हल्ला, क्रिमिआचा मिळवलेला ताबा, सायबरहल्ले, निवडणुकांमधील हस्तक्षेप, मानवाधिकारांचे उल्लंघन, युक्रेनमधील विमान पाडण्याची घटना यासारख्या मुद्यांवरून पाश्‍चात्य समुदायाने रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. पाश्‍चात्य देशांच्या या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानेही निर्बंधांची घोषणा केली होती. रशियावर लादलेल्या निर्बंधांनी रशियन अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचे दावे पाश्‍चात्य अभ्यासगटांनी केले आहेत. मात्र रशियाने हे दावे नाकारले असून उलट अशा निर्बंधांमुळे युरोपिय देशांनाच अधिक फटका बसल्याचे म्हटले आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष निर्बंधांच्या धमक्यांना भीक घालत नाहीत

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन पाश्‍चात्य देशांकडून देण्यात येणार्‍या निर्बंधांच्या धमक्यांना भीक घालत नाही, असे खळबळजनक वक्तव्य स्वीडनमधील रशियन राजदूतांनी केले आहे. ‘रशियावर आधीच भरमसाठ निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. नवे निर्बंध ही काही चांगली बाब नसेल, पण पाश्‍चात्य जे काही दावे करीत आहेत तितके वाईटही नाहीत. पाश्‍चात्य देशांनी रशियावर अधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर रशियाचे प्रत्युत्तर देखील तितकेच जबरदस्त असेल. निर्बंधांमुळे रशिया अधिक स्वावलंबी झाला असून रशियाची निर्यातही वाढली आहे’, असे स्वीडनमधील रशियन राजदूत व्हिक्टर तातारिन्तसेव्ह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात रशियाची परकीय गंगाजळी सुमारे ६३५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याची माहिती रशियाच्या मध्यवर्ती बँकेने दिली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info