किव्ह – युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियाने तीन बाजूंनी हल्ले चढविले आहेत. लवकरच किव्हचा ताबा रशियाकडे जाईल, असे दावे केले जातात. त्याचवेळी रशियाने किव्हसह खारकिव्ह व युक्रेनच्या इतर शहरांवरील हल्ले तीव्र केले आहेत. आज युक्रेनवर रशियन क्षेपणास्त्रे कोसळत आहेत, पण पुढच्या काळात नाटोच्या सदस्यदेशांवरही रशियन मिसाईल्स आदळतील. त्यामुळे नाटोने युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करावा अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली. मात्र नाटोचा युक्रेनच्या युद्धातील सहभाग म्हणजे तिसर्या महायुद्धाचा भडका ठरेल, असे युरोपिय काऊन्सिलच्या अध्यक्षांनी बजावले आहे.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या १९ व्या दिवशी भयंकर रक्तपात झाला आहे. आत्तापर्यंत या युद्धात युक्रेनमध्ये ६३६ नागरिक बळी पडले असून यामध्ये ४६ मुलांचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. मात्र काहीही झाले तरी युक्रेन रशियासमोर शरणांगती पत्करणार नाही, असा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. इतकेच नाही तर रशियासमर्थक मानल्या जाणार्या डोनेस्क भागात युक्रेनने चढविलेल्या हवाई हल्ल्यात २० जणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. युक्रेनचे लष्कर रशियाचा अत्यंत शौर्य आणि चलाखीने सामना करीत आहे, अशी प्रशंसा अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केला.
मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोने युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करावे, अशी मागणी आणखी एकवार केली. आज रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा करीत आहे, तशीच वेळ उद्या नाटोच्या सदस्यदेशांवर येईल, असा इशारा देऊन आत्ताच रशियाला रोखण्यासाठी नो फ्लाय झोन लागू करा, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली. याआधी अमेरिका व नाटोने झेलेन्स्की यांच्या या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करणे याचा अर्थ, या देशावर हल्ला चढविणारी रशियाची लढावू विमाने पाडणे असा होता. त्यामुळे ही मागणी करून झेलेन्स्की नाटोला रशियाविरोधी युद्धात खेचत असल्याचे दिसते.
मात्र युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांच्या मागणीचे गंभीर परिणाम लक्षात आणून दिले आहेत. युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करणे म्हणजे तिसरे महायुद्ध भडकविणे ठरेल, असा इशारा चार्ल्स मिशेल यांनी दिला.
दरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये अचूकतेने चढविलेल्या हल्ल्यात १८० परदेशी कंत्राटी जवानांना ठार केल्याचे म्हटले आहे. याचे अधिक तपशील रशियाने जाहीर केलेले नाहीत. पण काही दिवसांपूर्वी सिरियाच्या इदलिब व अलेप्पो भागातून अल कायदाशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेचे चारशेहून अधिक दहशतवादी रशियाच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये दाखल झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |