इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इस्रायलच्या हवाई दलाचा सराव सुरू

सराव

तेल अविव – इस्रायलच्या हवाईदलाने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याची तयारी करावी. यासाठी हवाईदलाने कसून सराव करावा, असे आदेश इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी इस्रायली हवाईदलाला दिले. इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली. गेल्याच आठवड्यात इस्रायलने इराणवर हल्ले चढविण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची विशेष तरतूद केली होती.

इस्रायलच्या संरक्षणदलाने याआधी आपल्या लष्करी सरावात इराणच्या लष्करी तसेच अणुप्रकल्पाच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा अभ्यास केला होता. पण गेल्या दोन वर्षांपासून इस्रायलने सदर सरावात खंड पडला होता. याचे कारण उघड होऊ शकलेले नाही. पण अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारल्याने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्ल्याची गरज इस्रायलला वाटत नसल्याचे बोलले जात होते. मात्र अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबरोबर अणुकरारावर वाटाघाटी सुरू केल्यामुळे, दोन वर्षानंतर इस्रायलने आपल्या हवाई दलाला इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्याचा सराव करण्याचे आदेश दिले आहेत.

सराव

इस्रायलच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी हवाईदलाला इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्यांचा कसून सराव करण्याचे आदेश दिले होते. या बातमीवर इस्रायली लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या आठवड्यातच इस्रायलने इराणवरील हल्ल्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची विशेष तरतूद केली होती.

इराण अधिकाधिक अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचत असून इराणला रोखण्यासाठी इस्रायल सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इराणकेंद्री तरतुदीचे समर्थन केले होते. तर इस्रायलचे अर्थमंत्री एविग्दोर लिबरमन यांनी इराणबरोबरील संघर्ष अपरिहार्य असून कुठल्याही क्षणी याचा भडका उडेल, असे बजावले होते. राजकीय वाटाघाटी किंवा करार करून इराणचा अणुकार्यक्रम थांबणार नाही, याची जाणीव लिबरमन यांनी करुन दिली होती.

याआधी जानेवारी महिन्यात कोशावी यांनी इस्रायलच्या संरक्षणदलाला जबरदस्त लष्करी हल्ल्याची तयारी करण्याची सूचना केली होती. तर ऑगस्ट महिन्यात कोशावी यांनी अणुकार्यक्रमाचा वेग वाढविणार्‍या इराणविरोधात लष्करी योजना तीव्र करण्याचे जाहीर केले होते. इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांच्या या इशार्‍यावर इराणमधून प्रतिक्रिया उमटली होती.

सराव

दरम्यान, गेल्या महिन्याभरात इस्रायल व अमेरिकेच्या नेत्यांमध्ये झालेल्या भेटीतूनही इराणबाबत दोन्ही देशांमध्ये एकवाक्यता नसल्याचे उघड झाले आहे. अणुबॉम्ब निर्मितीजवळ पोहोचत असलेल्या इराणला रोखण्यासाठी अमेरिकेने दुसर्‍या पर्यायाचा अर्थात ‘प्लॅन बी’चा वापर करावा, असे इस्रायली नेत्यांनी आपल्या अमेरिका भेटीत सुचविले होते. अमेरिकेने इराणबरोबरचा चुकीचा अणुकरार इस्रायलसह या क्षेत्राला युद्धाच्या खाईत ढकलेल, असे इस्रायली गुप्तचर विभागाचे मंत्री एली कोेहेन यांनी बजावले होते. पण तरीही अमेरिका इराणशी अणुकरारवरील वाटाघाटी करण्यावर ठाम आहे. त्यामुळे एकटा इस्रायल देखील इराणला अणुबॉम्बनिर्मितीपासून रोखू शकतो, असे सांगून इस्रायलने इराणविरोधात जय्यत तयारी सुरू केलेली आहे.

आपल्या अणुप्रकल्पांवरील हल्ला म्हणजे युद्धाची घोषणा ठरेल व तसे करणार्‍या इस्रायलला भस्मसात केले जाईल, अशा धमक्या याआधी इराणने दिलेल्या आहेत. मात्र इराणच्या धमक्यांची आपल्याला पर्वा नसून राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेला कुठलाही निर्णय घेताना इस्रायल कचरणार नाही, असे इस्रायली नेते बजावत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info