सलग दुसर्‍या दिवशीही रशियाने युक्रेनवर हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागले

सलग दुसर्‍या दिवशीही रशियाने युक्रेनवर हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागले

किव्ह – सलग दुसर्‍या दिवशीही रशियाने युक्रेनमध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला. या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी न्यूक्लिअर ड्रिल अर्थात अणुहल्ल्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या सरावाची घोषणा केली. यामुळे युक्रेनच्या युद्धाची भीषणता अधिकच वाढत असल्याचे दिसू लागले आहे. याबरोबर रशियन सैन्याने युक्रेनच्या राजधानीसह इतर प्रमुख शहरांवरील हल्ल्याची तीव्रता वाढविल्याच्या बातम्या येत आहेत.

सलग दुसर्‍या दिवशीही युक्रेनच्या मारिओपोल शहरात ४०० जणांनी आश्रय घेतला होता. इथेच रशियाने केलेल्या बॉम्बफेकीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, असा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला. रशियाचे हे ‘मारिओपोल टेरर’ इतिहासात नोंदविले जाईल, अशी जळजळीत टीका झेलेन्स्की यांनी केली. तर युक्रेनच्या दाव्यांवर अविश्‍वास व्यक्त करून रशियाने पुढच्या काळात युक्रेन आपणच अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ले चढवून त्याचे खापर रशियावर फोडेल, असा संशय व्यक्त केला आहे.

युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी हल्ले चढविणार्‍या रशियन सैन्यासमोर युक्रेनच्या जवानांनी शरणांगती पत्करल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे राजधानी किव्ह वाचविण्यासाठी रशियन सैन्याचा मोठ्या शौर्याने युक्रेनचे लष्कर प्रतिकार करीत असल्याचे दावे निकालात निघाले आहेत. त्याचवेळी मारिओपोल शहरावर रशियाचे नियंत्रण प्रस्थापित होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. युक्रेनमध्ये या घडामोडी सुरू असताना, शेजारी देश बेलारूसच्या लष्कराचे प्रचंड ताफे पोलंडच्या सीमेनजिक तैनात केले जात असल्याचे वृत्त आहे.

बेलारूस हा रशियासमर्थक देश असून पोलंड हा अमेरिका-नाटोसमर्थक देश मानला जातो. युक्रेनी लष्कराला पोलंडमार्फत सहाय्य पुरविण्याची तयारी अमेरिका व नाटोने केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, बेलारूसने पोलंडच्या सीमेवर तैनाती वाढवून या देशाला सज्जड इशारा दिल्याचे दिसते आहे. यामुळे युक्रेनच्या युद्धाची व्याप्ती वाढत चालली असून रशिया कुठल्याही परिस्थितीत अमेरिका-नाटोचे डावपेच यशस्वी होऊ देणार नाही, असे आपल्या कारवायांद्वारे दाखवून देत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info