रशिया दक्षिण युक्रेनसह डोन्बासवर ताबा मिळविल

- रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा दावा

डोन्बासवर ताबा

मॉस्को/किव्ह – रशिया दक्षिण व पूर्व युक्रेनचा पूर्ण ताबा मिळवून क्रिमिआ प्रांतापर्यंत ‘लँड कॉरिडॉर’ तयार करेल असा दावा रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला. रशियन अधिकाऱ्याच्या दाव्यामुळे युक्रेनमधील संघर्ष पुढील काही महिन्यांपर्यंत लांबण्याचे संकेत मिळाले आहेत. रशियन अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यावर युक्रेनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाकडून आलेले वक्तव्य साम्राज्यवादी मानसिकतेचा भाग असल्याची टीका युक्रेनने केली आहे. दरम्यान, युक्रेन अण्वस्त्रांपासून मुक्त तसेच अलिप्त राहण्याची खात्री पटल्यावर रशिया आपली मोहीम थांबवेल, असा दावा रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्टोनोव्ह यांनी केला आहे.

रशियाच्या ‘सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्ट’चे ‘ॲक्टिंग कमांडर’ म्हणून सक्रिय असणाऱ्या मेजर जनरल रुस्तम मिनेकेव्ह यांनी एका कार्यक्रमात युक्रेनमधील दुसऱ्या टप्प्याची व्याप्ती स्पष्ट केली. ‘युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात, डोन्बास व दक्षिण युक्रेनवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करणे हे रशियन फौजांचे प्रमुख उद्दिष्ट असेल. त्यामुळे रशियाला क्रिमिआपर्यंत भूभाग उपलब्ध होईल. डोन्बास व क्रिमिआमध्ये लँड कॉरिडॉर तयार करण्यात येईल’, असे मेजर जनरल रुस्तम मिनेकेव्ह यांनी सांगितले. या भागावर ताबा मिळविल्यानंतर मोल्दोव्हातील ‘ट्रान्सनिस्ट्रिआ’ या रशिया समर्थक प्रांतापर्यंत सहज मार्ग उपलब्ध होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.

डोन्बासवर ताबा

मेजर जनरल रुस्तम मिनेकेव्ह यांच्या वक्तव्यावर युक्रेनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘आता रशियाने आपले खरे इरादे लपविणेदेखील थांबविले आहे. लष्करी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश पूर्व व दक्षिण युक्रेनवर ताबा मिळविणे हाच आहे. यातून त्यांचा साम्राज्यवाद दिसून येतो’, अशी टीका युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केली आहे. ही टीका करतानाच रशियाने खार्किव्हसह लुहान्स्क, डोनेत्स्क व दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह शहरावर जोरदार हल्ले चढविल्याची माहितीही युक्रेनकडून देण्यात आली आहे.

डोन्बासवर ताबा

दरम्यान, रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्टोनोव्ह यांनी, रशिया युक्रेनला कधीही अण्वस्त्रसज्ज तसेच नाटो सदस्य देश बनू देणार नाही याचा पुनरुच्चार केला. ‘युरोपच्या पूर्व भागात असणारा युक्रेन कधीही अण्वस्त्रसज्ज होणार नाही तसेच कोणत्याही विशिष्ट गटातील देश बनणार नाही, याची रशियाला खात्री हवी आहे. ती मिळाल्यावर रशिया युक्रेनमधील मोहीम थांबवेल. रशिया, युक्रेन व बेलारुसमध्ये राहणाऱ्या स्लाव्ह वंशाच्या लोकांसाठी ही बाब महत्त्वाची ठरते’, असे राजदूत ॲनातोली ॲन्टोनोव्ह यांनी बजावले. युक्रेनमधील युद्ध रशिया जिंकू शकतो, असे संकेत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान जॉन्सन यांनी रशियाकडे असलेल्या लष्करी सामर्थ्याचा उल्लेख करून हे युद्ध रशिया जिंकण्याची शक्यता वास्तववादी आहे, असे म्हटले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info