तुर्कीकडून भूमध्य सागरात पुन्हा चिथावणीखोर कारवाया सुरू – सागरी मोहिमेची मुदत वाढवली

तुर्कीकडून भूमध्य सागरात पुन्हा चिथावणीखोर कारवाया सुरू – सागरी मोहिमेची मुदत वाढवली

अथेन्स/अंकारा – ‘एजिअन सी’ क्षेत्रात झालेल्या भूकंपानंतर जगाचे लक्ष आपत्तीत झालेल्या हानीवर केंद्रीत झाले असतानाच, तुर्कीने मात्र आपल्या चिथावणीखोर कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. गेल्या महिन्यात तुर्कीने भूमध्य सागरात पाठविलेल्या जहाजाची मुदत ४ तारखेला संपणार होती. मात्र आपल्या विस्तारवादी व आक्रमक धोरणांपासून माघार घेण्याचे नाकारत, तुर्कीने आपाली सागरी मोहीम १४ नोव्हेंबरपर्यंत चालू ठेवण्याचे जाहीर केले. यावर ग्रीसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, तुर्कीच्या कारवायांनी भूमध्य सागरी क्षेत्रातील तणावात अधिकच भर पडल्याचे ग्रीक परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वीच तुर्कीच्या कारवायांमुळे ग्रीसच्या नौदलाने ‘अलर्ट’ जारी केला होता.

चिथावणीखोर कारवाया

ऑगस्ट महिन्यात, तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी धाडले होते. त्यावेळी भूमध्य सागरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचवणाऱ्या बेकायदेशीर कारवाया तुर्कीने ताबडतोब थांबवाव्यात, असा इशारा ग्रीसने दिला होता. अमेरिकेसह युरोपीय महासंघ व नाटोनेही तुर्कीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली होती. अमेरिका व युरोपने ग्रीसचे समर्थन करीत तुर्कीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तुर्कीने आपले जहाज भूमध्य सागरी क्षेत्रातून माघारी घेऊन ग्रीसबरोबर चर्चेस सुरुवात केली होती. मात्र गेल्या महिन्यात तुर्की नौदलाने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून ‘ओरुक रेईस’ ही ‘रिसर्च शिप’, ‘अतामान’ व ‘सेंगीज हान’ या दोन जहाजांसह ‘कॅस्टेलोरिझो’ या ग्रीक बेटानजिक रवाना केली होती. सुरुवातीला ही जहाजे २२ ऑक्टोबरपर्यंत सक्रिय असतील, असे सांगणाऱ्या तुर्कीने या मोहिमेला सलग तीनदा मुदतवाढ देत ग्रीसला पुन्हा चिथावणी दिली आहे.

चिथावणीखोर कारवाया

गेल्या महिन्यात तुर्कीचे जहाज ग्रीक बेटाच्या किनारपट्टीपासून अवघ्या १४ किलोमीटर्सवर दाखल झाले होते. सध्या ही जहाजे ग्रीसच्या विशेष क्षेत्रापासून लांब असली तरी या क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात, असा दावा ग्रीक यंत्रणांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रीसने तुर्कीने आपली जहाजे ताबडतोब मागे घ्यावीत, असे बजावले आहे. ग्रीसच्या या इशाऱ्यावर तुर्कीने प्रत्युत्तर दिले असून, ग्रीसला आमच्या मोहिमेवर आक्षेप घेण्याचा अधिकारच नाही, या शब्दात धमकावले आहे. ग्रीसने आमच्याशी बिनशर्त बोलणी सुरू करावीत, असा इशाराही तुर्कीकडून देण्यात आला.

गेल्या महिन्यात ग्रीसने तब्बल ६० युद्धनौका व जहाजे तुर्कीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केली होती. तुर्कीकडून सातत्याने देण्यात येणारी चिथावणी व ग्रीसने थेट संघर्षासाठी केलेली तयारी यामुळे नजिकच्या काळात कधीही ग्रीस व तुर्कीमध्ये संघर्षाची ठिणगी उडण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही देश आक्रमक भूमिका सोडण्यास तयार नाल्याने या ठिणगीचे रूपांतर युद्धात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रीस व तुर्की हे दोन्ही नाटो सदस्य देश असल्याने यातून अधिकच गुंतागुंत निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info