मॉस्को/किव्ह – युक्रेनचे युद्ध भडकविण्यासाठी पाश्चिमात्य देश जबाबदार आहेत. पण 1945 सालाप्रमाणेच आताही रशियाचाच विजय होईल, अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली. दुसऱ्या महायुद्धात रशियाने नाझी जर्मनीवर मिळविलेल्या विजयानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिक्टरी डे’च्या कार्यक्रमात, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा युक्रेनमधील उद्दिष्टे पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा दिला. त्याचवेळी रशियन फौजा मातृभूमीच्या संरक्षणासाठी लढत असल्याचाही दावा केला.
पुतिन यांच्या वक्तव्यांवर पाश्चिमात्य देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पुढील काळात युक्रेन दोन ‘विजय दिवस’ साजरे करेल, असा टोला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी लगावला. तर रशियाकडे विजय साजरा करण्यासारखे काहीच नाही, अशी टीका अमेरिकेने केली आहे.
‘युक्रेन व त्याला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य सहकारी देशांनी डोन्बास व क्रिमिआवर आक्रमणाची योजना बनवली होती. रशियाच्या सीमांवर जाणुनबुजून धोकादायक स्थिती निर्माण करण्यात आली. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी सल्लागार व शस्त्रे तैनात करण्यात आली. रशियासमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक ठेवलेला नव्हता. त्यामुळे शत्रूचा हल्ला होण्याआधीच कारवाई करण्याचा निर्णय रशियाने घेतला. हा निर्णय एका स्वतंत्र, सार्वभौम व सामर्थ्यशाली देशाने निवडलेला पर्याय होता’, अशा शब्दात पुतिन यांनी युक्रेनवरील कारवाईमागची भूमिका स्पष्ट केली.
रशियाची संरक्षणदले सध्या आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत असल्याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली. ‘रशियन जवान आपल्या मातृभूमीसाठी, त्याच्या भविष्यासाठी संघर्ष करीत आहेत. या संघर्षामुळेच दुसऱ्या महायुद्धातून मिळालेला धडा कोणीही विसरणार नाही, याची जाणीव ठेवा’, असेही पुतिन यावेळी म्हणाले. दुर्दैवाने नाझीवाद पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून युक्रेन फॅसिझमच्या विळख्यात अडकल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाझीवादाचा पुनर्जन्म रोखणे हे रशियन्सचे कर्तव्य असल्याचे आवाहनही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘व्हिक्टरी डे’ निमित्त रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये भव्य लष्करी संचलन पार पडले. या संचलनात मिसाईल लाँचर्स, रणगाडे व सशस्त्र वाहनांसह हजारो जवानांचा सहभाग होता. रशियन फौजा तसेच समर्थकांनी युक्रेनमधील मारिपोल, खेरसन यासारख्या शहरांमध्येही ‘व्हिक्टरी डे’चे कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र पाश्चिमात्य माध्यमे तसेच सोशल मीडियावर रशियाच्या संचलनात नेहमीप्रमाणे भव्यता व लष्करी सामर्थ्याच्या आक्रमक प्रदर्शनाचा अभाव होता, अशी टीका होत आहे. पुतिन यांच्या ‘व्हिक्टरी डे’ कार्यक्रमावरही पाश्चिमात्यांनी कोरडे ओढले. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी, युक्रेनवरील युद्धातून रशिया 70 वर्षांपूर्वीच्या फॅसिझमची पुनरावृत्ती करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |