मॉस्को/ब्रुसेल्स – नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करणाऱ्या स्वीडन व फिनलँड या देशांमध्ये लष्करी तळ उभे राहिले तर त्याला रशिया अण्वस्त्रतैनातीने प्रत्युत्तर देईल, असा इशारा रशियन वृत्तवाहिनीवर देण्यात आला आहे. ‘रोसिया वन’ या वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात रशिया ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ तैनात करेल, असे बजावण्यात आले आहे. रविवारी फिनलँड व स्वीडन या देशांनी नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्याची घोषणा केल्यानंतर हा इशारा देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच रशियाचे वरिष्ठ नेते दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी, नाटो व रशियातील संभाव्य संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात होऊ शकते, असे बजावले होते.
रविवारी सकाळी फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषदेत नाटोत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर काही तासातच स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांनी, स्वीडनमधील सत्ताधारी पक्षही नाटोत सामील होण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली. मात्र नाटोचा सदस्य झाल्यानंतर अण्वस्त्र तैनाती व कायमस्वरुपी लष्करी
तळास स्वीडनचा विरोध असेल, असेही सांगण्यात आले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अलिप्त भूमिका घेणाऱ्या स्वीडनने गेल्या 200 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या लष्करी आघाडीत सहभागी होण्याचे नाकारले होते. त्यामुळे नाटोतील सहभागाची तयारी हा स्वीडनच्या धोरणातील ऐतिहासिक व क्रांतिकारी बदल ठरला आहे.
फिनलँड व स्वीडनच्या नाटोत सामील होण्याच्या निर्णयामुळे रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. रशियन वृत्तवाहिनीने दोन्ही देशांना ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’च्या तैनातीची धमकी दिली आहे. बाल्टिक सागरी क्षेत्रात रशियाचा कॅलिनिनग्रॅड हा संरक्षणतळ सक्रिय आहे. या तळावर अण्वस्त्रांच्या तैनातीसाठी नव्या सुविधा व यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. या तळावर झालेल्या सरावांमध्ये रशियन संरक्षणदलांकडून अण्वस्त्रांचा वापरही करण्यात आला होता. सध्या या तळावर ‘इस्कंदर’ ही अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे तैनात असल्याचेही सांगण्यात येते. मात्र रशियाने त्यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. ‘रोसिया वन’वर झालेल्या कार्यक्रमात देण्यात आलेली धमकी इस्कंदरच्या तैनातीबाबतच असावी, असा दावा करण्यात येतो.
‘फिनलँड व स्वीडनने नाटोबाबत घेतलेला निर्णय मोठी चूक आहे. रशिया हे सहजगत्या खपवून घेईल, अशा भ्रमात या देशांनी राहू नये. नाटो, अमेरिका व इतर सदस्य देशांनीही ही वूक करू नये’, असा इशारा रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यापूर्वीच दोन्ही देशांना नाटोतील सहभागावरून प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |