किव्ह/मॉस्को – रशियाने झॅपोरिझिआ मधील अणुऊर्जा प्रकल्प ‘ग्रिड’पासून तोडून युक्रेनसह युरोपला आण्विक आपत्तीच्या उंबरठ्यावर उभे केल्याचा आरोप युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. रशियाने आपल्यावरील आरोप स्पष्ट शब्दात फेटाळले असून युक्रेनच्या हल्ल्यांमुळेच प्रकल्पात संकट निर्माण झाल्याचे टीकास्त्र सोडले. गुरुवारी अणुप्रकल्पाजवळ लागलेल्या आगीमुळे काही काळासाठी सदर प्रकल्प ‘नॅशनल ग्रिड’पासून तोडण्यात आला होता. शुक्रवारी प्रकल्प पुन्हा कार्यरत झाल्याची माहिती युक्रेनी कंपनी तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिली. प्रकल्पात घडलेली नवी दुर्घटना संभाव्य आपत्तीचे संकेत देणारी असल्याचा दावा तज्ज्ञ तसेच विश्लेषकांकडून करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता. सदर प्रकल्प युक्रेनसह युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असून त्याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम तसेच अणुइंधनाचा साठा आहे. सध्या या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारीच कार्यरत आहेत. युक्रेनने गेल्या महिन्यात दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
प्रकल्पांमध्ये होणाऱ्या हल्ल्यांसाठी रशिया व युक्रेनने सातत्याने परस्परांना जबाबदार धरले आहे. रशियाने याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेतही आपली बाजू मांडली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने सदर प्रकल्पाला भेट देण्याची घोषणा केली होती. येत्या काही दिवसात आयोगाचे पथक प्रकल्पाला भेट देणार असून त्यासाठी रशियाबरोबर करार झाल्याचेही सांगण्यात येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आयोगाच्या भेटीला परवानगी दिली आहे.
पण या भेटीपूर्वीच प्रकल्पात मोठी दुर्घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. गुरुवारी अणुप्रकल्पाजवळ असणाऱ्या कोळशाच्या क्षेत्रांना आग लागली. या आगीमुळे अणुप्रकल्पाचा नॅशनल ग्रिडशी असलेला संपर्क तोडणे भाग पडले. यामुळे प्रकल्प बंद पडण्याचा धोकाही निर्माण झाला होता. असे झाल्यास प्रकल्पातून आण्विक व किरणोत्सर्गी घटकांचे उत्सर्जन होण्याचा धोका होता. मात्र काही काळाने प्रकल्पातील अडचणी दूर करण्यात आला व शुक्रवारी प्रकल्पाचे काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी घडलेल्या घटनेसाठी युक्रेनने रशियाला जबाबदार धरले आहे. प्रकल्प ग्रिडपासून तोडला गेल्याने युक्रेनसह संपूर्ण युरोप ‘न्यूक्लिअर डिझास्टर’पासून अवघे एक पाऊल दूर होता, असा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला. प्रकल्पातील वीजपुरवठ्याच्या लाईन्सना रशियाने हानी पोहोचविल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जगाने हा धोका नीट समजून घेण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पण रशियाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. उलट युक्रेनकडून अणुप्रकल्पावर हल्ले करण्यात येत होते व या हल्ल्यांसाठी वापरण्यात येणारी यंत्रणा नष्ट केल्याचे रशियाने म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |