मॉस्को – ‘पाश्चिमात्य देशांनी जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवस्थेचा पाया कमकुवत केला आहे. अमेरिकी डॉलर तसेच युरो व पौंड स्टर्लिंग या चलनांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या व्यवहारांबरोबरच गुंतवणूक तसेच राखीव चलन म्हणून असणारी विश्वासार्हता गमावली आहे. पाश्चिमात्य देशांच्या धोरणांमुळेच रशिया व इतर अनेक देश इतर चलनांचा वापर करण्याकडे वळत आहेत’, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. राष्ट्राध्यक्ष पुतिन हा दावा करीत असतानाच, पुढील काळात रशियन अर्थव्यवस्थेतील ‘डी-डॉलरायझेशन’ची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असे रशियाचे उपवाणिज्यमंत्री इलिआ तोरोसोव्ह यांनी म्हटले आहे.
रशियाच्या व्लाडिवोस्तोक शहरात ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धासह अनेक मुद्यांवर आपली भूमिका मांडली. ‘टप्प्याटप्याने आपण जगातील अविश्वासार्ह व धोकादायक चलनांपासून दूर जात आहोत. रशियाच नाही तर अमेरिकेचे सहकारी असणारे देशही डॉलरमधील बचत व देण्याघेण्याचे व्यवहार कमी करीत आहेत. यासंदर्भातील आकडेवारीही समोर आली आहे’, असे पुतिन म्हणाले. त्याचवेळी त्यांनी चीनच्या युआन चलनाचे समर्थनही केले.
डॉलरचा वापर कमी करणारे देश चीनच्या युआनकडे वळत असल्याचा दावा पुतिन यांनी केला. रशियाची आघाडीची इंधनकंपनी गाझप्रोमनेही चीनबरोबर युआन व रुबलच्या व्यवहारांसंदर्भात नुकताच करार केला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गाझप्रोम कंपनीचे प्रमुख अलेक्सी मिलर यांनी कराराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानुसार रशिया व चीनमधील इंधनव्यवहारांमध्ये यापुढे ५० टक्के रुबल व ५० टक्के युआनचा वापर होणार आहे.
दरम्यान, पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाला नुकसान नाही तर फायदाच झाला आहे, असा दावा केला. ‘युक्रेन युद्धामुळे रशियाचे नुकसान झालेले नाही व पुढेही होणार नाही. उलट रशियाच्या सार्वभौमत्त्वाची प्रक्रिया अधिकच वेगवान व मजबूत झाली आहे. यातून रशिया अंतर्गतदृष्ट्या अधिकच भक्कम होईल. रशियासाठी अनावश्यक, हानिकारक तसेच पुढे जाण्यास अडथळे ठरणाऱ्या सर्व गोष्टी नाकारल्या जातील’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. यावेळी त्यांनी युक्रेन युद्धामुळे रशियात तसेच जागतिक पातळीवरही ध्रुवीकरण झाल्याची कबुलीही दिली.
पाश्चिमात्यांकडून लादण्यात येणाऱ्या निर्बंधांच्या धोरणावरही रशियन राष्ट्राध्यक्षांनी टीकास्त्र सोडले. पाश्चिमात्य देशातील उच्चभ्रू वर्ग स्वतःचे वर्चस्व कायम राखण्यासाठी विरोध करणाऱ्या देशांवर निर्बंध लादत आहे. हे निर्बंध लादणाऱ्या देशांमधील जनताही त्रस्त बनली आहे, याकडे पुतिन यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी निर्बंध लादून रशियाला एकटे पाडता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. रशिया आशिया तसेच आखाती देशांशी असलेले सहकार्य वाढवेल, असे संकेत पुतिन यांनी यावेळी दिले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |