चीन बळाचा वापर करून क्षेत्रातील स्थिती बदलण्याच्या तयारीत आहे – जपानचे नवे पंतप्रधान किशिदा यांचा आरोप

टोकिओ/बीजिंग – चीन आपल्या सामर्थ्याच्या बळावर काही भागांमधील यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप जपानचे नवे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी केला. किशिदा यांचे हे उद्गार जपानचे नवे पंतप्रधान चीनच्या वर्चस्ववादाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत देणारे ठरतात. यावेळी जपानच्या पंतप्रधानांनी ‘टीटीपी’ व मानवाधिकारांच्या मुद्यावरूनही चीनला लक्ष्य केले. पंतप्रधान किशिदा यांनी चीनच्या मानवाधिकारांच्या मुद्यावर विशेष सल्लागाराची नेमणूक केल्याची माहितीही समोर आली आहे.

पंतप्रधान किशिदा

पंतप्रधान होण्यापूर्वी किशिदा यांनी २०१२ ते २०१७ या कालावधीत परराष्ट्रमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. या काळात किशिदा यांनी चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले होते. पंतप्रधानपदाच्या निवडीच्या प्रक्रियेदरम्यानही त्यांनी चीनबाबत रोखठोक वक्तव्ये केली होती. यात सेंकाकू बेटसमुह तसेच तैवानसंदर्भातील वक्तव्यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी चीनवर केलेला आरोप लक्ष वेधून घेणारा ठरतो.

जपान व चीनदरम्यान ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रातील सेंकाकू आयलंडचा मुद्दा चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. चीनकडून या क्षेत्रात घुसखोरीचे प्रयत्न वाढल्याचे गेल्या काही वर्षात समोर येत आहे. चीनच्या मच्छिमारी नौका, युद्धनौका, पाणबुड्या तसेच टेहळणी विमाने या क्षेत्रात धडक देत आहेत. याविरोधात जपानने तीव्र चिंता व्यक्त केली असून या भागातील गस्त व संरक्षणसज्जता वाढविण्याचे संकेत दिले आहेत. गेल्याच महिन्यात, जपानच्या संरक्षण मंत्रालयाने वाढीव संरक्षणखर्चाचा प्रस्ताव सरकारला सादर केला असून त्यानुसार, २०२२ सालासाठी ५० अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची मागणी केली आहे.

जपानच्या नव्या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सरकारी मुखपत्राने त्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. अमेरिका व चीनबरोबरील संबंध हाताळताना किशिदा यांनी समतोल दाखवावा, असे ‘ग्लोबल टाईम्स’ने बजावले आहे. यावेळी चिनी मुखपत्राने जपानच्या नव्या पंतप्रधानांनी मानवाधिकारांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करु नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info