खार्किव्हनंतर लुहान्स्क प्रांतात युक्रेनचे प्रतिहल्ले सुरू

- बिलोहॉरिव्हका टाऊन ताब्यात घेतल्याचा दावा

लुहान्स्क

मॉस्को/किव्ह – खार्किव्हमध्ये रशियन लष्कराला माघार घेण्यास भाग पाडल्यानंतर युक्रेनने आपले लक्ष लुहान्स्क प्रांतावर केंद्रित केले. मंगळवारी लुहान्स्क प्रांतातील बिलोहॉरिव्हका टाऊन ताब्यात घेतल्याचा दावा युक्रेनी लष्कराने केला. युक्रेनी लष्कराच्या या नव्या प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ या प्रांतांनी सार्वमताची घोषणा केली आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपविण्याची इच्छा आहे, असा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी केला.

युक्रेनच्या लष्कराने काही दिवसांपूर्वी रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या खार्किव्हवर हल्ले चढवून रशियन तुकड्यांना मागे लोटण्यात यश मिळविले होते. त्यानंतर युक्रेनी लष्कराची मोहीम काहीशी थंड पडल्याचे मानले जात होते. याच काळात रशियन फौजांनी युक्रेनवर जबरदस्त व घणाघाती हल्ले केले होते. त्यामुळे युक्रेन खार्किव्ह व दक्षिणेतील खेर्सनपुरती प्रतिहल्ल्यांची मोहीम मर्यादित ठेवण्याचे संकेत मिळाले होते. मात्र युक्रेनी लष्कराकडून लुहान्स्क प्रांतात हल्ल्यांना सुरुवात झाली असून गेल्या २४ तासांमध्ये युक्रेनने लुहान्स्कमधील पहिला भाग ताब्यात घेतल्याचे दावे करण्यात येत आहेत.

लुहान्स्क

युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, लुहान्स्क प्रांतातील बिलोहॉरिव्हका टाऊन ताब्यात घेण्यात आले. हा भाग लुहान्स्क प्रांतातील सेव्हेरोडोनेत्स्क शहराचा हिस्सा आहे. रशियाने जुलै महिन्यात या भागासह लुहान्स्क प्रांतावर पूर्ण ताबा मिळविल्याची घोषणा केली होती. मात्र आता युक्रेनने या प्रांतातही रशियन फौजांवर प्रतिहल्ले सुरू केल्याने ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरते. रशियाने लुहान्स्कनजिक संघर्ष सुरू झाल्याचे मान्य केले असून बिलोहॉरिव्हकावर युक्रेनच्या ताब्याला दुजोरा दिलेला नाही. युक्रेन लुहान्स्कमध्ये हल्ले करीत असतानाच रशियाने डोनेत्स्क प्रांतातील बाखमतवर मोठे हल्ले चढविल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली.

लुहान्स्क

दरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये ताब्यात घेतलेल्या भागाला अधिकृत मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ या प्रांतातील प्रशासनांनी सार्वमत घेण्याची घोषणा केली आहे. येत्या आठवड्याभरात रशियात सामील व्हायचे की नाही या मुद्यावर सार्वमत घेण्यात येईल, असे संबंधित प्रांतांच्या प्रमुखांकडून सांगण्यात आले. या वृत्ताला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह तसेच माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दुजोरा दिला. युक्रेनने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून सार्वमताची घोषणा पराजयाच्या भीतीतून करण्यात आल्याचा दावा केला आहे.

युक्रेनचे प्रतिहल्ले व सार्वमताची घोषणा या पार्श्वभूमीवर रशियाला युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवायचा असल्याचे वृत्त समोर आले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी यासंदर्भात दावा केला. ‘पीबीएस’ या अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एर्दोगन यांनी, रशियन राष्ट्राध्यक्षांशी समरकंदमध्ये झालेल्या चर्चेचा हवाला दिला. यात पुतिन यांनी युक्रेन संघर्ष संपविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे एर्दोगन यांनी म्हटले आहे. मात्र त्याचवेळी सध्याची स्थिती संघर्ष लवकर थांबेल अशी नसल्याचा दावाही तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. यावेळी रशिया व युक्रेनमध्ये २०० कैद्यांच्या प्रत्यार्पणाबाबत एकमत झाल्याचेही एर्दोगन यांनी सांगितले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info