तैवानवर निर्णायक कारवाईचा चीनच्या राजवटीचा इशारा

बीजिंग – ‘तैवानमधील स्वातंत्रतावादी गटांनी चीनला चिथावणी देणे सुरू ठेवले आणि मर्यादा ओलांडली तर तैवानवर निर्णायक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय चीनकडे नसेल`, अशी धमकी चीनच्या ‘तैवान अफेअर्स` विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली. नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी चीनने लष्करी साहसवादाला प्रोत्साहन देऊ नये, असा इशारा दिला होता. त्याचबरोबर हाँगकाँगमधील मानवाधिकार व लोकशाही, या मुद्यांवर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्रमक भूमिका मांडली होती. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने तैवानला ही धमकी दिल्याचे दिसते.

निर्णायक

गेल्या वर्षभरात चीनने तैवानच्या हवाई तसेच सागरी हद्दीतील घुसखोरी वाढविली आहे. लढाऊ विमाने, बॉम्बर्स तसेच विनाशिका आणि पाणबुड्या तैवानच्या क्षेत्रात रवाना करून चीनने तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांच्या लोकशाहीवादी सरकारवरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. हा चीनच्या ‘ग्रे झोन वॉरफेअर`चा भाग मानला जातो. थेट युद्ध न करता युद्धसदृश्‍य परिस्थिती निर्माण करून तणाव वाढविण्याचा प्रयत्न चीन या ग्रे झोन युद्धतंत्राद्वारे करीत आहे. याने तैवान जेरीस येईल, असे चीनला वाटत असल्याचे दिसते. या पार्श्‍वभूमीवर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लवकरच तैवान चीनमध्ये विलिन होईल, असा इशारा दिला होता. त्यावर तैवानच्या स्थितीबाबत चीनच्या सत्ताधाऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी फटकारले होते. तसेच लोकशाही व स्वातंत्र्यासाठी धडपड करणे हा काही गुन्हा ठरत नाही, एकाधिकारशाही असलेल्या चीनपुढे तैवान कधीही झुकणार नाही, अशा शब्दात तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी चीनला खडसावले होते.

निर्णायक

चीनच्या ‘तैवान अफेअर्स` विभागाच्या प्रवक्त्या झु फेंगलियान यांची यावर तीव्र प्रतिक्रिया आली. त्यांनी तैवानला निर्णायक परिणामांची धमकी दिली. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई व त्यांचा पक्ष ‘डेमोक्रॅटीक प्रोग्रेेसिव्ह पार्टी`ने यांनी 1992 सालचा चीनमधील विलिनीकरणाचा निर्णय नाकारल्यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा फेंगलियान यांनी केला. लोकशाहीची मागणी, प्रक्षोभक कारवाया आणि विदेशी शक्तींसह चीनविरोधात सहकार्य प्रस्थापित करून राष्ट्राध्यक्षा त्साई यांनीच हा तणाव वाढविल्याचा आरोप चीनच्या प्रवक्त्यांनी केला.

दरम्यान, पूर्व आशियातील तणावासाठी तैवानला जबाबदार धरणारा चीन तैवानच्या क्षेत्रातील हवाई व सागरी घुसखोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरातून तैवानला मिळणारे समर्थन चीनची चिंता वाढविणारे असल्याची जाणीव हे विश्‍लेषक करुन देत आहेत. ब्रिटनने तैवानवरून चीनला सज्जड इशारा दिला होता. तर काही दिवसांपूर्वी जर्मनीने देखील तैवानची बाजू घेऊन चीनवर टीका केली होती. त्यानंतर बर्लिनमधील चीनच्या राजदूतांनी जर्मनीवर जोरदार टीका केली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info