वॉशिंग्टन/बीजिंग/मॉस्को – चीन व रशियाविरोधात अणुयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वाढली आहे, असा इशारा अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’चे प्रमुख ॲडमिरल चार्ल्स ए. रिचर्ड यांनी दिला. गेल्या तीन दशकांमध्ये अमेरिकेला अशा प्रकारचे प्रतिस्पर्धी व आव्हानांचा सामना करावा लागला नव्हता, याकडेही ॲडमिरल रिचर्ड यांनी लक्ष वेधले. दोन दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत रशिया देत असलेली धमकी पोकळ नसल्याचा खरमरीत इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकी अधिकाऱ्यांकडून आलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
‘पाश्चिमात्य देश रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेलची धमकी देत आहेत. पण हा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे. जर रशियाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान मिळाले तर देश व जनतेच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात येईल. मी हवेत बोलत नाही, याची जाण पाश्चिमात्यांनी ठेवावी’, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चिमात्यांना वास्तवाची जाणीव करून दिली.
झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावरील हल्ले व नाटो सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या माध्यमातून रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न झाले. रशियाविरोधात अण्वस्त्रे वापरण्याचे इशारे देण्यात आले. या देशांनी रशियाकडे नाटो देशांपेक्षाही प्रगत अण्वस्त्रे असल्याचे लक्षात ठेवावे, असेही पुतिन यांनी बजावले होते.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या मेरिलँड प्रांतात झालेल्या एका कार्यक्रमात वरिष्ट अधिकाऱ्यांनी अणुयुद्धाच्या वाढत्या शक्यतेकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘अमेरिका अंडर अटॅक-डिफेंडिंग द होमलॅण्ड’ या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ॲडमिरल रिचर्ड यांनी रशिया व चीन युद्धाशी निगडित कोणत्याही क्षेत्रातील संघर्ष टोकाला नेण्याची क्षमता ठेवणारे देश आहेत, याची जाणीव करून दिली. अशा प्रकारचे प्रतिस्पर्धी अमेरिकेने गेल्या काही काळात अनुभवलेले नाहीत, असे रिचर्ड म्हणाले.
चीन व रशिया या दोन्ही देशांकडून आण्विक संघर्षाच्या मुद्यावर असलेला धोका व त्यांच्याविरोधात उडणाऱ्या संघर्षाची शक्यता वाढली आहे, असा इशाराही त्यांनी दिला. यामुळे पुढील काळात युद्धाचे स्वरुप बदलू शकते, असेही अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी ॲडमिरल रिचर्ड यांनी अमेरिकेत नुकत्याच सादर झालेल्या ‘न्यूक्लिअर पोश्चर रिव्ह्यू’चाही उल्लेख केला. यात अमेरिकेने ‘न्यूक्लिअर ट्रायड’चे आधुनिकीकरण तसेच ‘कमांड व कंट्रोल सिस्टिम’मध्ये सुधारणा करण्याबाबत घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरतात, असा दावा त्यांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |