बेलारुसमधील अण्वस्त्र तैनातीच्या घोषणेनंतर रशियाकडून सैबेरियात ‘न्यूक्लिअर मिसाईल एक्सरसाईज’ची सुरुवात

- तीन हजार जवानांसह ‘स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’ सहभागी

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी बेलारुसमध्ये ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’च्या तैनातीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अवघ्या चार दिवसात रशियाने अण्वस्त्रांचा व्यापक सराव सुरू केला आहे. बेलारुसमधील तैनातीची घोषणा व नवा अण्वस्त्र सराव म्हणजे रशियाने पाश्चिमात्य देशांना दिलेला संदेश असल्याचा दावा रशियन विश्लेषकांनी केला.

बेलारुसमधील

रशियाच्या संरक्षण विभागाने बुधवारी ाण्विक सरावाचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ प्रसिद्ध केले. रशियाच्या सैबेरिया क्षेत्रातील तीन प्रांतांमध्ये अण्वस्त्रांचा सराव सुरू झाला आहे. यात ‘आरएस-२४ यार्स’ या प्रगत अण्वस्त्रांचा समावेश आहे. या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणेचा पल्ला जवळपास १२ हजार किलोमीटर्सचा असून त्यात एका वेळी किमान चार ‘न्यूक्लिअर वॉरहेडस्‌‍’ वाहून नेण्याची क्षमता आहे.

बेलारुसमधील

सिलो किंवा मोबाईल लाँचरच्या सहाय्याने डागता येणारे हे अण्वस्त्र ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स’ना सहज गुंगारा देऊ शकते. नियोजित लक्ष्यावर अचूक व भेदकपणे मारा करणारे हे अण्वस्त्र काही वर्षांपूर्वी रशियाच्या संरक्षणदलात सामील करण्यात आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यार्सचा उल्लेख ‘इनव्हिन्सिबल वेपन’ म्हणून केला होता. रशियाच्या ‘न्यूक्लिअर ट्रायड’मधील जमिनीवरून मारा करता येणारे प्रमुख अण्वस्त्र म्हणून यार्स सध्या ओळखले जाते.

बुधवारपासून सुरू झालेल्या सरावात रशियाच्या ‘स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’सह तीन हजार जवान सहभागी झाले आहेत. यात ‘नोव्होसिबिर्स्क मिसाईल फॉर्मेशन’ व ‘ओम्स्क मिसाईल कॉर्प्स’ या तुकड्यांचा समावेश आहे. पुढील काही दिवस सराव सुरू राहणार असून रशियाच्या ‘एरोस्पेस फोर्सेस’देखील त्यात सामील होतील, असी माहिती संरक्षण विभागाने दिली.

बेलारुसमधील

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वर्षभरात रशियाच्या संरक्षणदलांनी किमान तीनदा ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’ घेतल्याची माहिती दिली होती. त्याचवेळी रशियाकडून सरमात या हायपरसोनिक अण्वस्त्राच्या चाचण्याही घेण्यात आल्या होत्या. रशियाला पराभूत करण्याच्या योजना आखणाऱ्यांनी हा अण्वस्त्रसज्ज देश आहे, हे विसरू नये असेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी उघडपणे बजावले होते.

अलर्टवर असलेले ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ व अण्वस्त्रांच्या चाचण्या या पार्श्वभूमीवर रशिया अणुहल्ला करील, असे अंदाज पाश्चिमात्य माध्यमे तसेच विश्लेषकांकडून सातत्याने वर्तविण्यात येत होते. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेन युद्धात रशिया अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असे वक्तव्य करून अणुयुद्धाची शक्यता फेटाळली होती.

दरम्यान, युक्रेनने रशिया नियंत्रित युक्रेनचा भाग असलेल्या मेलिटोपोल शहरावर मोठा हल्ला चढविल्याचे समोर येत आहे. झॅपोरिझिआ प्रांताचा भाग असलेल्या या शहरावर बुधवारी पहाटे क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यांमुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचेही सांगण्यात येते. मेलिटोपोल रशियन लष्करासाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने त्यावरील हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info