रशियाने खेर्सन प्रांतातील धरण उडविणे म्हणजे अणुबॉम्ब टाकण्यासारखे ठरते

- युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

किव्ह/मॉस्को – रशियाने खेर्सन प्रांतातील नोवा काखोव्हा धरण व जलविद्युत प्रकल्प उडवून देणे म्हणजे अणुबॉम्ब टाकण्याइतकीच भयावह घटना ठरेल, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिला. रशियाकडून या धरणानजिकच्या परिसरात सुरुंग पेरण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही झेलेन्स्की यांनी केला. खेर्सन प्रांतात रशिया व युक्रेनच्या फौजांमध्ये गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरू असून रशियाने युक्रेनी प्रतिहल्ले रोखण्यात यश मिळाल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर देण्यात आलेला नवा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. दरम्यान, शुक्रवारी रशिया व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान फोनवरून संभाषण झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक हल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक प्रांतांवर क्षेपणास्त्र तसेच ड्रोनहल्ले करण्यात येत आहेत. रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेन जेरीस आल्याचे संकेत मिळत असून युक्रेनच्या अनेक प्रांतांमधील वीज व पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दुसऱ्या बाजूला डोन्बास क्षेत्रातही रशियन फौजांना यश मिळत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे युक्रेनी लष्कराने आपले सर्व लक्ष दक्षिण युक्रेनमधील खेर्सनवर केंद्रित केले असून हा भाग परत मिळविण्याची जोरदार धडपड सुरू आहे.

मात्र रशियाने संरक्षणदलात केलेले फेरबदल व नवी भरती या पार्श्वभूमीवर रशियन फौजा अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खेर्सन भागात युक्रेनचे प्रतिहल्ले रोखण्यात यश मिळत असल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले होते. खेर्सन प्रांतातील मोहीमेत अपयश आल्यास युक्रेनसाठी तो मोठा धक्का ठरु शकतो. त्यामुळे आता युक्रेनने रशियन फौजांविरोधात ‘फॉल्स फ्लॅग अटॅक’चे आरोप सुरू केले असून नोवा काखोव्हाबाबत युक्रेनी राष्ट्राध्यक्षांचे आरोप त्याचाच भाग दिसत आहे.

 यापूर्वी युक्रेनने झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पावरूनही रशियावर अनेक आरोप केले होते. मात्र या आरोपांमध्ये फारसे तथ्य नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता युक्रेनी राजवटीकडून खेर्सनमधील धरणाबाबत आरोप सुरू करण्यात आले आहेत. रशिया सुरुंगांच्या सहाय्याने हे धरण उडवून मोठी पूरस्थिती निर्माण करेल व त्याच्या आधारावर खेर्सनमधून माघार घेईल, असे चित्र युक्रेनकडून तयार करण्यात येत आहे. हे आरोप रशियाने फेटाळले असून उलट युक्रेनच धरणाच्या भागात हल्ल्यांची तयारी करीत असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रशिया व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शुक्रवारी रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू व अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यात फोनवरून बोलणी झाल्याचे रशियन संरक्षणविभागाकडून सांगण्यात आले. या चर्चेत युक्रेनमधील संघर्षाचा मुद्दाही होता, असा दावा रशियाने केला आहे. रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर रशिया व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची ही दुसरी वेळ ठरते.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info