चीनच्या युद्धनौकेवरून ऑस्ट्रेलियाच्या टेहळणी विमानावर लेझर हल्ला

- ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाचा आरोप

लेझर हल्ला

कॅनबेरा/बीजिंग – ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस असणार्‍या ‘अराफुरा सी’ भागात गस्त घालणार्‍या ‘पी-८ए पोसायडन’ या टेहळणी विमानावर चीनच्या युद्धनौकेने लेझर हल्ला चढविला. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाने हा आरोप केला असून सदर हल्ला सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत गंभीर घटना असल्याचे बजावले आहे. चीनने ऑस्ट्रेलियावर लेझर हल्ला चढविण्याची ही गेल्या तीन वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मे २०१९मध्ये चीनने ‘साऊथ चायना सी’मधून प्रवास करणार्‍या ऑस्ट्रेलियन हेलिकॉप्टरवर लेझरचा हल्ला चढविला होता.

गुरुवारी चीनच्या दोन युद्धनौका ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस असलेल्या ‘अराफुरा सी’ सागरी क्षेत्रातून प्रवास करीत होत्या. या क्षेत्रात गस्त घालणार्‍या ऑस्ट्रेलियन हवाईदलाच्या ‘पी-८ए पोसायडन’ या टेहळणी विमानाने त्यांच्या हालचाली टिपल्या. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिनी युद्धनौकांमधील एका युद्धनौकेने ऑस्ट्रेलियाच्या टेहळणी विमानावर लेझरचा हल्ला केला. हल्ल्यामुळे टेहळणी विमानाच्या मोहिमेत अडथळा आल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाने या घटनेची माहिती उघड केली असून चीनच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदविला आहे.

लेझर हल्ला

‘चिनी युद्धनौकेने केलेला लेझरचा मारा ही सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत गंभीर घटना आहे. अशा घटनांमुळे जीवितहानी होऊ शकते. या हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाच्या जवानांची सुरक्षा धोक्यात आली होती. व्यावसायिक लष्कराकडून अशा प्रकारच्या कारवाईची अपेक्षा नसते. चीनची कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी ठरते’, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणदलांनी चीनवर ताशेरे ओढले आहेत. चीनकडून या घटनेवर अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

लेझर हल्ला

गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध तणावपूर्ण बनले असून लेझर हल्ल्याच्या नव्या घटनेने दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता समोर येत आहे. ‘साऊथ चायना सी’ तसेच तैवानच्या मुद्यावर चीनविरोधात आक्रमक धोरण स्वीकारलेल्या ऑस्ट्रेलियाला चीन वारंवार धमकावित आहे. तैवानची बाजू घेतल्यास ऑस्ट्रेलिया चिनी क्षेपणास्त्रांचे लक्ष्य ठरु शकतो, असा इशाराही चीनकडून देण्यात आला होता.

चीनने आंतरराष्ट्रीय नियमांची पर्वा न करता आपल्या प्रतिस्पर्धीं देशांवर अतिप्रगत शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियन टेहळणी विमानावर चढविलेला लेझर हल्ला चीनच्या आक्रमकतेचे आणखी एक उदाहरण असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी चीनने ‘ईस्ट चायना सी’ तसेच उत्तर आफ्रिकेतील जिबौतीजवळ प्रवास करणार्‍या अमेरिकेच्या विमानांवर लेझरचे हल्ले चढविले होते.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info