मॉस्को/वॉशिंग्टन – ‘अमेरिका युरोपिय देशांमध्ये प्रगत अण्वस्त्रे तैनात करण्याच्या हालचाली करीत आहे. या अण्वस्त्रांची अचूकता व क्षमता वाढविण्यात आली असून त्याचे रुपांतर युद्धभूमीवर वापरता येणाऱ्या शस्त्रांमध्ये करण्यात आल्याचे दिसते. रशिया याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. अमेरिकी तैनातीच्या पार्श्वभूमीवर रशियालाही आपल्या धोरणांमध्ये बदल करणे भाग पडेल’, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री अलेक्झांडर ग्रुश्को यांनी दिला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच इतर आघाडीच्या नेत्यांनी युक्रेनवरील अणुहल्ल्याबाबत आक्रमक वक्तव्ये केली होती. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण असून अणुयुद्धाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने युरोपातील तळांवर सध्या तैनात असलेल्या अण्वस्त्रांच्या जागी प्रगत अण्वस्त्रे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी युरोपात नाटोच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत अमेरिकेने नव्या प्रगत अणुबॉम्ब्सच्या तैनातीचे संकेत दिले. त्यानुसार, अमेरिकेने विकसित केलेले ‘बी-61 ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब्स’ येत्या दोन महिन्यात युरोपिय देशांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. अमेरिकेतील ‘पॉलिटिको’ या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘बी-61 ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब्स’ हे ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ असल्याचे सांगण्यात येते. रशियाकडे सुमारे दोन हजार ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ असून अमेरिकेने युरोपात 200 अण्वस्त्रे तैनात केल्याचे मानले जाते.
नाटो आघाडीत अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन व फ्रान्स या देशांकडे अण्वस्त्रे आहेत. मात्र ही अण्वस्त्रे अमेरिकेकडे असलेल्या ‘बी-61 ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब्स’प्रमाणे प्रगत नसल्याचे सांगण्यात येते.