युक्रेनने क्रिमिआत केलेल्या ड्रोनहल्ल्यांनंतर रशियाची ‘ग्रेन डील’मधून बाहेर पडल्याची घोषणा

युक्रेन

मॉस्को/किव्ह – युक्रेनने क्रिमिआतील रशियन नौदलाच्या तळावर चढविलेल्या हल्ल्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. संयुक्त राष्ट्रसंघटना व तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या ‘ग्रेन एक्सपोर्ट डील’मधून आपण बाहेर पडत असल्याची घोषणा रशियाने केली आहे. युक्रेनने या करारासाठी निर्माण केलेल्या कॉरिडॉरचा वापर करून रशियावर हल्ले चढविल्याचा आरोप रशियाने यावेळी केला. ‘ग्रेन डील’मधून बाहेर पडण्याच्या रशियाच्या निर्णयावर अमेरिका व युरोपिय देशांसह युक्रेनने जोरदार टीका केली. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशिया पुन्हा एकदा अन्नधान्याचा शस्त्रासारखा वापर करीत आहे, असा आरोप केला.

‘ग्रेन डील’मधून बाहेर

शनिवारी पहाटेच्या सुमारास क्रिमिआतील रशियन नौदलाचा तळ असणाऱ्या सेव्हॅस्टोपोल बंदरावर युक्रेनकडून ड्रोन हल्ले चढविण्यात आले. या हल्ल्यांमध्ये रशियाच्या एका युद्धनौकेसह काही जहाजांचे नुकसान झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. यावेळी युक्रेनने अंडरवॉटर ड्रोन्सचा वापर केल्याचे दावेही करण्यात आले आहेत. या हल्ल्यांसाठी अमेरिका व ब्रिटनने युक्रेनला सहाय्य केल्याचे आरोप रशियाकडून करण्यात आले.

रशियन बंदरावर ड्रोनहल्ले होत असताना अमेरिकेचे रिपर ड्रोन ब्लॅक सी सागरी क्षेत्राच्या हद्दीत टेहळणी करीत होते, असा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला. त्याचबरोबर ड्रोनहल्ल्याची योजना तयार करण्यासाठी ब्रिटनच्या विशेष गटाने युक्रेनच्या लष्कराला सहाय्य पुरविले असा ठपकाही रशियाने ठेवला आहे. सेव्हॅस्टोपोल बंदरावर झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशिया या हल्ल्यांना दोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही देण्यात आला. अमेरिका व ब्रिटनने रशियाचे आरोप फेटाळले असून सदर दावे तथ्यहीन असल्याचा खुलासा केला.

‘ग्रेन डील’मधून बाहेर

क्रिमिआतील ड्रोनहल्ल्यांसाठी ‘ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मानवतावादी कॉरिडॉरचा वापर करण्यात आल्याचा आरोप रशियाने केला. त्यामुळे यापुढे आपण या उपक्रमात सहभागी होणार नसून त्यातून बाहेर पडत आहोत, असे रशियाच्या संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. जुलै महिन्यात तुर्की व संयुक्त राष्ट्रसंघटनेने केलेल्या मध्यस्थीनंतर रशियाने ‘ग्रेन डील’वर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानुसार युक्रेनच्या बंदरांमध्ये अडकलेले लक्षावधी टन धान्य निर्यात करण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत लक्षावधी टन अन्नधान्य युरोप, आफ्रिका तसेच आशियातील देशांना निर्यात करण्यात आले होते.

मात्र आता रशिया यातून बाहेर पडल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अन्नधान्याच्या टंचाईचे संकट गंभीर रुप धारण करु शकते, अशी भीती विश्लेषक व्यक्त करीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी रशिया पुन्हा अन्नधान्याचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याचा आरोप केला आहे. तर युक्रेनने रशियाकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info