अझरबैजानी लष्कराने क्लस्टर बॉम्ब्सचा वापर केल्याचा आर्मेनियाचा आरोप

अझरबैजानी लष्कराने क्लस्टर बॉम्ब्सचा वापर केल्याचा आर्मेनियाचा आरोप

येरेवान/बाकु – आर्मेनिया व अझरबैजानमध्ये गेले नऊ दिवस सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या युद्धात अझरबैजानने प्रतिबंधित क्लस्टर बॉम्ब्सचा वापर केल्याचा आरोप आर्मेनियाने केला आहे. तर आर्मेनियाकडून नागरी वस्त्यांमध्ये क्षेपणास्त्रे व रॉकेट्सचा मारा करण्यात येत असल्याचा दावा अझरबैजान सरकारने केला आहे. यादरम्यान, इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह अली खामेनी यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या इराणी धर्मगुरूंनी अझरबैजानला समर्थन जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

क्लस्टर बॉम्ब्सचा वापर

रविवारपासून आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे दावे दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहेत. युद्धाचे कारण ठरलेल्या ‘नागोर्नो-कॅराबख’मध्ये अझरबैजानने संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध टाकलेल्या क्लस्टर बॉम्ब्सचा वापर केल्याचा आरोप आर्मेनियाच्या संरक्षण विभागाने केला आहे. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ आर्मेनियन संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी काही फ़ोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत. कॅराबखमधील वस्त्यांमध्ये क्लस्टर बॉम्ब्सचा वापर करण्यात आल्याचेही आर्मेनियाने म्हटले आहे. ‘नागोर्नो-कॅराबख’चा भाग असलेल्या स्टेपनकेर्ट व शुशी या प्रमुख शहरांमध्ये गेल्या २४ तासापासून सातत्याने क्षेपणास्त्रे व रॉकेट हल्ले सुरू असल्याची माहिती आर्मेनियन प्रवक्त्यांनी दिली. त्याचवेळी यापुढील हल्ले आर्मेनियाच्या मुख्य भूमीवर होतील, अशी धमकी अझरबैजानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचेही समोर आले आहे.

क्लस्टर बॉम्ब्सचा वापर

तर आर्मेनियाच्या लष्कराने युद्धभूमीपासून दूर असलेल्या तीन नव्या शहरांना लक्ष्य केल्याचा दावा अझरबैजानने केला आहे. यापूर्वी आर्मेनियाने अझरबैजानमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या ‘गांजा’ला लक्ष्य केले होते. या शहरातील हवाईतळ उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता तार्तार, बर्दा व बेलगन या शहरांवर आर्मेनियाने क्षेपणास्त्रे हल्ले केल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. हे हल्ले नागरी वस्त्यांवर झाले असून अनेक नागरिकांचा बळी गेल्याचेही अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आर्मेनियाने आपल्याविरोधातील दावे फेटाळून लावले आहेत.

क्लस्टर बॉम्ब्सचा वापर

दरम्यान, आर्मेनिया-अझरबैजान युद्धात इराणनेही उडी घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह अली खामेनी यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या धर्मगुरुंनी उघडपणे अझरबैजानला समर्थन जाहीर केले आहे. अझरबैजान-इराण सीमेवरील ‘ईस्ट अझरबैजान’, ‘वेस्ट अझरबैजान’, ‘झनझन’ व ‘अर्दबिल’ प्रांतांमधील धर्मगुरूंनी, ‘नागोर्नो-कॅराबख’ ताब्यात घेण्यासाठी अझरबैजानने चढवलेले हल्ले योग्य असल्याचे म्हटले आहे. ही कारवाई संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ठरावांशी सुसंगत असल्याचा दावाही इराणी धर्मगुरूंनी केला आहे.

गेल्या आठवड्यात, इराणने आर्मेनियाला शस्त्रास्त्रे पुरविल्याचे दावे समोर आले होते. मात्र इराणने हे दावे फेटाळले होते. त्यानंतर इराणच्या हद्दीत काही मॉर्टर्स पडल्याचीही माहिती समोर आली होती. यापूर्वी तुर्की व पाकिस्तानने आर्मेनिया-अझरबैजान युद्धात अझरबैजानला उघड समर्थन जाहीर केले होते. आता इराणकडूनही अझरबैजानला सहाय्य मिळत असावे, असा संशय इराणी धर्मगुरूंच्या निवेदनामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काळात युद्ध अधिकच चिघळण्याची शक्यता दिसू लागली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info