रशियाचे ‘डूम्स डे मिसाईल’ कधीही, कुठेही आकस्मिक हल्ला चढवू शकते – ब्रिटनच्या गुप्तचर प्रमुखांचा इशारा

रशियाचे ‘डूम्स डे मिसाईल’ कधीही, कुठेही आकस्मिक हल्ला चढवू शकते – ब्रिटनच्या गुप्तचर प्रमुखांचा इशारा

लंडन/मॉस्को – ‘रशियाकडून सबसोनिक प्रकारातील आण्विक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र जगात कधीही, कुठेही आकस्मिक हल्ला चढवू शकते’, असा इशारा ब्रिटनच्या ‘डिफेन्स इंटेलिजन्स’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल जिम हॉकेनहल यांनी दिला. रशियाकडून संपूर्ण जगाला धोका निर्माण होईल अशी विध्वंसक शस्त्रे विकसित करण्यात येत असून विज्ञानाच्या मर्यादा ओलांडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ब्रिटीश गुप्तचर प्रमुखांनी बजावले. रशियाचे हे नवे क्षेपणास्त्र अनेक वर्षे आकाशात राहू शकते, असा दावाही यावेळी लेफ्टनंट जनरल जिम हॉकेनहल यांनी केला आहे.

२०१८ साली रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगभरातील माध्यमांसमोर रशियाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडविले होते. भविष्यात महायुद्ध पेटले तर रशियाची काय तयारी असेल, याची झलक राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी यावेळी दाखविली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात रशियाकडून सातत्याने प्रगत अण्वस्त्रे तसेच क्षेपणास्त्रांच्या आधुनिक आवृत्त्यांची चाचणी सुरु आहे. त्यात त्सुनामी निर्माण करून अख्खे शहर नष्ट करण्याची क्षमता असलेले ‘पोसायडन’ नावाचे ‘डूम्स डे’ ड्रोन, ‘अ‍ॅवॅनगार्ड’ हायपरसोनिक क्षेपणास्त्र व ‘डूम्स डे मिसाईल’सारख्या शस्त्रांचा समावेश आहे.

ब्रिटीश गुप्तचर प्रमुखांनी दिलेला इशारा ‘ब्युरवेस्टनिक मिसाईल’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राबाबत असल्याचे मानले जाते. अमेरिका व नाटोकडून या क्षेपणास्त्राला ‘स्कायफॉल’ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या वर्षी रशियाच्या ‘सेवेर्दोविंच’ शहरात झालेला गूढ स्फोट याच क्षेपणास्त्राच्या चाचणीशी निगडित होता, असे सांगण्यात येते. स्फोटाच्या वेळेस क्षेपणास्त्रात वापरण्यात येणाऱ्या ‘न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर’ची क्षमता तपासण्यात येत होती, असाही दावा करण्यात येतो.

ब्रिटीश माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील आघाडीच्या देशांचा समावेश असलेल्या ‘फाईव्ह आईज’ गटाच्या बैठकीत रशियाच्या क्षेपणास्त्राचा मुद्दा उपस्थित झाला होता. या गटात अमेरिकेसह ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांचा समावेश असून हा गट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्थापन करण्यात आला होता. या पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांच्या बैठकीत रशियन ‘डूम्स डे मिसाईल’ चा मुद्दा उपस्थित होणे व त्यानंतर ब्रिटीश गुप्तचर प्रमुखांनी त्याबाबत इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

गेल्याच महिन्यात रशियाने आपल्या आण्विक धोरणात मोठे बदल केल्याचे जाहीर केले होते. त्यात, रशिया किंवा रशियाच्या मित्रदेशांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली गेली तर तो रशियावरील अणुहल्ला समजला जाईल आणि त्याला रशियाकडून आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा देण्यात आला होता.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info