पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर रशियन भूभागावर हल्ले चढविल्यास जोरदार प्रत्युत्तर मिळेल

- रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचा इशारा

पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर रशियन भूभागावर हल्ले चढविल्यास जोरदार प्रत्युत्तर मिळेल

मॉस्को /किव्ह – ‘रशियाचा प्रतिसाद कोणत्याही प्रकारचा असू शकतो. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. सध्या ज्या प्रकारचे धोके रशियासमोर आहेत, त्याचा विचार करता रशियाने आपल्या कारवाईसाठी कोणतीही मर्यादा आखलेली नाही. रशियाच्या धोरणांनुसार आम्ही कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्रे वापरु शकतो. त्यात आण्विक धोरणाचाही समावेश आहे. पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर युक्रेनने रशियाच्या भूभागात हल्ले चढविले तर त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल. क्रिमिआसारख्या प्रांतातील हल्ल्यांच्या मुद्यावर चर्चा नाही तर फक्त प्रतिहल्ले होतील. सध्याच्या किव्हच्या राजवटीखाली असलेल्या संपूर्ण युक्रेनची जळून राख होईल’, असा खरमरीत इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला.

जोरदार प्रत्युत्तररशिया-युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षाची तीव्रता गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. रशियाने युक्रेनच्या संपूर्ण आघाडीवर प्रखर हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. उत्तरेला असणाऱ्या खार्किव्हपासून दक्षिणेकडील ओडेसापर्यंत अनेक भागांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क व बाखमत या शहरांमधील लढाईने भयावह स्वरुप धारण केल्याचे दावे दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहेत. बाखमतवरील ताबा दोन्ही देशांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला असून रशियन फौजा टप्प्याटप्प्याने या शहराभोवती वेढा आवळत असल्याचे समोर येत आहे.

बाखमतच्या संघर्षात सहभागी असलेल्या रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात युक्रेनचे लष्कर प्राण पणाला लावून बाखमतचा इंच न इंच लढत असल्याचे सांगण्यात आले आहे. बाखमतमध्ये प्रत्येक रस्ता व प्रत्येक घरासाठी टोकाची लढाई सुरू असल्याचा दावाही ‘वॅग्नर ग्रुप’ने केला. त्याचवेळी युक्रेनी लष्कराने शहराच्या कोणत्याही भागातून अद्याप माघार घेतली नसल्याकडेही रशियन गटाने लक्ष वेधले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही बाखमतसह पूर्व युक्रेनमधील अनेक भागांमध्ये युक्रेनी लष्कर अत्यंत कठीण परिस्थितीत असल्याचा दावा केला.बाखमतपाठोपाठ रशियाने गेल्या 24 तासांमध्ये खार्किव्ह, झॅपोरिझिआ, मायकोलेव्ह, ओडेसा या भागांमध्येही क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली. ओडेसावरील हल्ल्यात वीज उपकेंद्र जळून नष्ट झाल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याचेही समोर आले. तर युक्रेनच्या विविध तळांवर केलेल्या हल्ल्यात शंभरहून अधिक जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे. खेर्सन शहरातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रशियन फौजांचा मारा असल्याचे सांगण्यात येते.दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने युक्रेनला 2.2 अब्ज डॉलर्सचे नवे शस्त्रसहाय्य घोषित केले आहे. यात ‘जीएलएसडीबी’ क्षेपणास्त्रांसह ‘हायमार्स’ रॉकेटस्‌‍, 250 जॅवेलिन अँटी टँक वेपन्स, दोन हजार रणगाडाभेदी रॉकेटस्‌‍, 181 सशस्त्र वाहने, हॉक एअर डिफेन्स सिस्टिम्स, ड्रोन्स व रडार्सचा समावेश आहे. शनिवारी रशिया व युक्रेनमध्ये सुमारे 200 युद्धकैद्यांची अदलाबदल करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info