मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहरासह लुहान्स्क व खार्किव्ह भागात आगेकूच करण्यात रशियन फौजांना यश मिळाले आहे. खार्किव्ह प्रांतातील २० छोटी गावे व इतर भागांवर रशियन लष्कराने ताबा मिळविल्याची माहिती वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी बाखमतमध्ये प्रत्येक घर व प्रत्येक मीटर अंतरासाठी प्रखर संघर्ष सुरू असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. दरम्यान, युक्रेनवरील नव्या आक्रमणात मोठ्या हवाईहल्ल्यांचा वापर करण्याची योजना रशियाने आखली असल्याचा दावा पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून रशियाने पूर्व युक्रेनमधील बाखमत शहराला अधिक आक्रमकपणे लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हे शहर नियंत्रणाखाली आणण्याची रशियाची योजना असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रशियाने या शहरासह नजिकच्या परिसरात जबरदस्त हल्ले सुरू केले असून त्याला तोंड देणे युक्रेनी लष्करासाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसह बहुतांश नेते व अधिकाऱ्यांकडून वारंवार याचा उल्लेख करण्यात येत आहे. मात्र तरीही बाखमतमधील अखेरच्या जवानापर्यंत संघर्ष करण्याचे इरादे युक्रेनने व्यक्त केले आहेत. त्याचवेळी रशियन लष्करानेही बाखमतसाठी मोठ्या प्रमाणात लष्करी तुकड्या व शस्त्रसाठा तैनात केला असून टप्प्याटप्प्याने शहरावर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या काही दिवसात रशियाने बाखमतच्या सीमेवरील दोन भाग ताब्यात घेतल्याचेही समोर आले आहे.
दुसऱ्या बाजूला युक्रेनी लष्कराकडून लुहान्स्क प्रांतात करण्यात आलेले हल्ले रशियाने परतवून लावले आहेत. त्याचबरोबर लुहान्स्कला जोडून असलेल्या खार्किव्हमधील भाग ताब्यात घेण्यातही यश मिळविले आहे. रशियाचे वरिष्ठ अधिकारी विताली गन्चेव्ह यांनी, खार्किव्हमधील २० गावे व भागांवर ताबा मिळविल्याची माहिती दिली आहे. तर काही भागांमध्ये अटीतटीचा संघर्ष सुरू असल्याचा दावाही केला आहे.
गेल्या वर्षी रशियन लष्कराला खार्किव्हमधून पूर्ण माघार घेणे भाग पडले होते. मात्र त्यानंतर आता रशियाने पुन्हा एकदा या प्रांतावर हल्ले सुरू करून काही भाग ताब्यात घेण्यात यश मिळविल्याचे नव्या माहितीवरून दिसून येत आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये रशियाने खेर्सन, मायकोलव्ह व झॅपोरिझिआ भागात मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले चढविल्याचेही समोर आले. रशियाकडून ७०हून अधिक हल्ले झाल्याचे युक्रेनने सांगितले आहे.
दरम्यान, युक्रेनवरील नव्या आक्रमणादरम्यान रशिया मोठ्या प्रमाणात हवाईहल्ले चढविल, असा दावा पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. रशियाने युक्रेन सीमेवरील हवाईतळांवर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्सची जमवाजमव केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. यासंदर्भातील सॅटेलाईट फोटोग्राफ्स पाश्चिमात्य यंत्रणांनी युक्रेन सरकारला दिल्याचा दावा ‘फायनान्शिअल टाईम्स’ या दैनिकाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रुसेल्समध्ये सुरू झालेल्या नाटो सदस्य देशांच्या बैठकीत लढाऊ विमानांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेकडे ‘एफ-१६’ची मागणी करण्यात आली असली तरी त्याच्या पुरवठ्यास अमेरिकेने नकार दिला आहे. तर ब्रिटीश लढाऊ विमाने युक्रेनला पुरविण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे संकेत ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बेन वॉलेस यांनी दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |