रशियन फौजांनी बाखमतला वेढा घातल्याचा स्थानिक अधिकाऱ्यांचा दावा

- राजधानी किव्हनजिक ड्रोनहल्ले

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहराला रशियन फौजांनी वेढा घातल्याचा दावा डोनेत्स्क प्रांतातील अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसात रशियन फौजा व ‘वॅग्नर ग्रुप’ने बाखमतजवळच्या पाच महत्त्वाच्या भागांवर नियंत्रण मिळविले असून युक्रेनी लष्कराला मिळणारी रसद तोडल्याची माहिती डोनेत्स्क प्रांतातील अधिकाऱ्यांनी दिली. बाखमतला वेढा घालत असतानाच रशियन दलांनी राजधानी किव्हनजिकच्या भागांमध्ये ड्रोन हल्ले चढविल्याचे समोर आले असून त्यात मोठी जीवितहानी झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी संरक्षण मंत्रालयाला युक्रेनमधील लष्करी तुकड्यांची फेररचना करण्याचे निर्देश दिल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे व विश्लेषकांनी केला आहे.

बाखमतला वेढा

रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी रशियन फौजा बाखमत ताब्यात घेतील, असे दावे युक्रेन तसेच पाश्चिमात्य यंत्रणांकडून करण्यात येत होते. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पूर्व युक्रेनमध्ये टप्प्याटप्याने आगेकूच करण्याचे व ताब्यात घेतलेल्या भागांवर योग्य नियंत्रण मिळविण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रशियन फौजा आक्रमणाची धार वाढवित छोटे भाग ताब्यात घेण्यावर भर देत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसात रशियाने पूर्व युक्रेनमधील सर्व आघाड्यांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. बाखमतसह कुपिआन्स्क, लिमन, वहलेदर या शहरांवर सातत्याने व प्रखर हल्ले सुरू आहेत. बाखमत शहरानजिकचे पाच महत्त्वाचे भाग ताब्यात घेण्यात रशियन फौजांना यश मिळाले आहे. बाखमतमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर रशियन तुकड्यांनी नियंत्रण मिळविल्याची माहिती डोनेत्स्कमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे बाखमतमध्ये सध्या तैनात असणाऱ्या युक्रेनी लष्कराची रसद तोण्यात यश आले असल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला. रशियन लष्कराने बाखमतला पूर्ण वेढा घातला असून लवकरच शहर ताब्यात येईल, असे संकेतही दिले. युक्रेनच्या यंत्रणांनी बाखमतमधील प्रत्येक इंच जागेसाठी संघर्ष सुरू असल्याचा दावा केला आहे.

बाखमतला वेढा घालतानाच पूर्व युक्रेनमधील इतर आघाड्यांवरही रशियाने आपले हल्ले वाढविले आहेत. यात खार्किव्ह, कुपिआन्स्क, लिमन, वहलेदर, ॲवडिव्हका व मरिन्का या शहरांचा समावेश आहे. झॅपोरिझिआ प्रांतातील काही भागांमध्ये रशियाने नव्या तुकड्या तैनात केल्याची माहितीही समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संरक्षणदलप्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना मार्च महिन्यापर्यंत पूर्ण डोन्बास क्षेत्रावर नियंत्रण मिळविण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यासाठी सध्या डोन्बासमध्ये तैनात होणाऱ्या रशियन तुकड्यांची फेररचना करण्याची सूचनाही करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, सोमवारी रशियाने राजधानी किव्ह तसेच ख्मेलनिटस्कि प्रांतात ड्रोन हल्ले केले. यासाठी इराणच्या शाहेद ड्रोन्सचा वापर करण्यात आला. रशियाने एकूण १४ ड्रोन्सचा वापर केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info