मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील सामरिकदृष्ट्या निर्णायक शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या बाखमतवर रशियन फौजा कोणत्याही क्षणी ताबा मिळवू शकतात, असा दावा डोनेत्स्क प्रांतातील रशियन सल्लागार यॅन गॅगिन यांनी केला. रशियन लष्कर व वॅग्नर ग्रुपने बाखमतमधील युक्रेनी फौजेभोवतीचा वेढा अधिकच आवळला असून शहरातील मध्यवर्ती क्षेत्र वगळता बहुतांश भागांवर रशियाने नियंत्रण मिळविले आहे. बाखमतमध्ये जवळपास तीन हजार युक्रेनी जवान अजूनही तैनात असल्याचे मानले जाते. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनीही बाखमतमधील स्थिती अत्यंत अवघड व कठीण बनल्याची कबुली दिली आहे. बाखमत वर ताबा मिळविल्यास रशियाचे पुढील आक्रमण अधिक प्रखर व वेगवान होईल, असा दावा काही विश्लेषक करीत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून रशियाने बाखमतवर लक्ष केंद्रित केल्याचे दावे करण्यात येत होते. मात्र नवीन वर्षात रशियन लष्कराने बाखमतमधील लढाईला प्राधान्य दिल्याचे समोर आले. बाखमतवरील ताब्यासाठी रशियाने मोठ्या प्रमाणात नवी लष्करी तैनाती केल्याचे तसेच शस्त्रसामुग्री उतरविल्याचे दिसून आले होते. टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचे धोरण आखत रशियाने एक एक भाग ताब्यात घेत बाखमतच्या दिशेने आगेकूच सुरू केली होती. याच काळात रशियाने लष्करी पातळीवर फेररचना करून युक्रेनमधील मोहिमेची संपूर्ण सूत्रे संरक्षणदलप्रमुखांकडे सोपविली होती.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी घेतलेल्या निर्णयांना यश मिळत असल्याचे सोलेदारच्या ताब्यावरून स्पष्ट झाले. सोलेदार हे बाखमतनजिकचे महत्त्वाचे शहर मानले जाते. यापूर्वी खार्किव्ह व खेर्सनमधील मोहिमेदरम्यान रशियन लष्कराला ताब्यात असलेला काही भाग गमावणे भाग पडले होते. मात्र डोन्बासमधील संघर्षात रशियाने कोणतेही महत्त्वाचे शहर अथवा भाग गमावलेला नाही. उलट बाखमतसाठी हळुहळू पावले उचलत शहराभोवतालचा वेढा घट्ट करण्यात यश मिळविल्याचे दिसते.
बाखमतवर ताबा मिळविल्यानंतर रशियन फौजा आपले लक्ष संपूर्ण डोन्बास व त्यानंतर खार्किव्हच्या दिशेने वळवतील, असे संकेत मिळत आहेत. रशियन माध्यमे व सोशल मीडियावर बाखमतच्या लढाईची तुलना दुसऱ्या महायुद्धातील ‘बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड’शी करण्यात येत आहेत. हे लक्षात घेता रशियाच्या मोहिमेतील बाखमतचे महत्त्व ठळकपणे समोर येते.
बाखमतबरोबरच रशियाने पूर्व युक्रेनमधील सर्व आघाड्यांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. बाखमतसह कुपिआन्स्क, लिमन, वहलेदर या शहरांवर सातत्याने व प्रखर हल्ले सुरू आहेत. झॅपोरिझिआ प्रांतातील काही भागांमध्ये रशियाने नव्या तुकड्या तैनात केल्याची माहितीही समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संरक्षणदलप्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना मार्च महिन्यापर्यंत पूर्ण डोन्बास क्षेत्रावर नियंत्रण मिळविण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |