Breaking News

अमेरिकेत हवामान बदल घडविणार्‍या ‘जिओइंजिनिअरिंग’ची चाचणी होणार – हवामानाचा शस्त्रासारखा वापर होण्याची चिंता

वॉशिंग्टन – हवामानात हवे ते बदल घडवून आणून आपत्तीही आणू शकणार्‍या तंत्रज्ञानाची चाचणी अमेरिकेत घेण्यात येणार आहे. यात ‘सोलर रेडिएशन’ व ‘कार्बन रिमूव्हल’ यांचा समावेश असून त्यांचा वापर ‘वेदर वेपन’ म्हणून होईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघात वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केलेल्या जॅनोस पॅस्झटोर यांनी याबाबत इशारा दिला.

अमेरिकेच्या संरक्षणदलाचा प्रकल्प म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘हार्प’ या संशोधनप्रकल्पाचा वापर जगातील विविध भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती घडविण्यासाठी करण्यात येतो, असे आरोप यापूर्वीच विविध विश्‍लेषक तसेच अभ्यासकांकडून करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या ‘हार्वर्ड’ विद्यापीठातील संशोधकांकडून येत्या काही महिन्यात ‘सोलर इंजिनिअरिंग’चा प्रयोग करण्यात येणार आहे. अवकाशात अधिकाधिक सूर्यप्रकाशाचे परावर्तन घडविण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. ही सध्या केवळ संकल्पना असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अशा प्रकारचा प्रयोग होणार असल्यास त्यावर योग्य नियंत्रण हवे, अशी मागणी जॅनोस पॅस्झटोर यांनी केली. ते सध्या ‘कार्नेजी क्लायमेट जिओइंजिनिअरिंग गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह’चे संचालक म्हणून कार्यरत असून ही संस्था हवामानबदलाबाबतच्या प्रयोगांवर नियंत्रण असावे, यासाठी मोहीम राबवीत आहे.

‘जिओइंजिनिअरिंग’ तंत्रज्ञानाअंतर्गत दुसरा प्रयोग ‘कार्बन रिमुव्हल’चा असून त्यात वातावरणातून कार्बन काढून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबत निश्‍चित माहिती अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र असे प्रयोग कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमावलीशिवाय पार पाडणे धोकादायक असल्याचा इशारा जॅनोस पॅस्झटोर यांनी दिला. इराण व उत्तर कोरियासारखे देश अशा प्रकल्पांना निधी पुरवून त्यांचा चुकीचा वापर करू शकतात, असेही त्यांनी बजावले.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/993482475962884097
https://www.facebook.com/WW3Info/