अमेरिकेची इराणबरोबरील अणुकरारातून माघार – कडक निर्बंध लादण्याचा निर्णय

अमेरिकेची इराणबरोबरील अणुकरारातून माघार – कडक निर्बंध लादण्याचा निर्णय

वॉशिंग्टन – अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेण्याची घोषणा केली. जगात उलथापालथ घडविणार्‍या या घोषणेबरोबरच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लवकरच इराणच्या विरोधात अत्यंत कडक निर्बंध लादण्याचा इशाराही दिला आहे. अणुकरारानुसार सवलती देऊनही इराणने अणुबॉम्ब मिळविण्यासाठीचे प्रयत्न थांबविले नाही. यामुळे अमेरिका या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

आधीच्या अमेरिकी प्रशासनाने केलेल्या अणुकरारावर सडकून टीका करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराचा हेतू अजिबात सफल झालेला नाही, असा ठपका ठेवला. अणुकराराद्वारे मिळालेल्या सवलतींचा वापर करून इराणने आपला अणुकार्यक्रम अधिकच गतिमान केल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. त्यामुळे हा करार भयंकर होता आणि ही अमेरिकन जनतेसाठी लाजिरवाणी बाब ठरत होती, अशी टीका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली. हा अणुकरार मोडीत काढताना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणच्या दहशतवादी तसेच अमेरिकाविरोधी कारवायांची उजळणी केली. इराणने अमेरिकेच्या दूतावासांवर तसेच लष्करी तळांवर हल्ले चढविले. अमेरिकेच्या शेकडो सैनिकांना इराणने संपविले असून कित्येकजणांचे अपहरण करून त्याचा छळही केला होता, याची आठवण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करून दिली.

दहशतवादाचा समर्थक असलेल्या इराणने आखातात संघर्ष पेटवून दिला. हिजबुल्लाह, हमास, अल कायदा आणि तालिबान यासारख्या खतरनाक दहशतवादी संघटनांना इराणने घातक क्षेपणास्त्रे देखील पुरविली आहेत. अशा या देशावर लादण्यात आलेले आर्थिक निर्बंध अणुकरार झाल्यानंतर मागे घेण्यात आले होते. त्याचा पुरेपूर फायदा इराणने उचलला आणि त्यानंतरच सिरिया व येमेन या देशांमध्ये इराणच्या धोकादायक हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे पाश्‍चिमात्य देशांनी इराणबरोबर केलेला अणुकरार या देशाला रोखणार नाही, तर विघातक कारवायांसाठी उत्तेजन देणाराच होता, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेत्यान्याहू यांनी काही दिवसांपूर्वी इराण अण्वस्त्रे विकसित करीत असल्याचे सिद्ध करणारे पुरावे जगजाहीर केले होते. त्याचाही संदर्भ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. यावरून इराण अण्वस्त्रे विकसित करीत नाही, हे खोटे ठरल्याचे ट्रम्प म्हणाले. म्हणूनच इराणबरोबरील अणुकरार कायम ठेवणे, याचा अर्थ या क्षेत्रात शस्त्रस्पर्धेला आमंत्रण देणे असा होतो. अमेरिका या आण्विक ब्लॅकमेलला बळी पडणार नाही आणि अमेरिकन नागरिकांच्या विरोधातील कुठल्याही हालचाली खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला.

ही घोषणा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर कडक निर्बंध लादण्याच्या आदेशावर स्वाक्षर्‍या केल्या असून इराणशी सहकार्य करणार्‍या देशांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सज्जड इशारा दिला. याचे फार मोठे पडसाद पुढच्या काळात उमटणार असून त्याचे पडसाद आत्तापासूनच उमटू लागले आहेत.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info