Breaking News

निवडणुकीच्या आधी अमेरिकेचे व्हेनेझुएलाच्या नेत्यांवर निर्बंध

व्हेनेझुएलाकॅराकस – व्हेनेझुएलामध्ये होणार्‍या निवडणुकीच्या आधी अमेरिकेने या देशातील काही नेत्यांवर निर्बंधांची घोषणा केली आहे. भयंकर आर्थिक संकटात सापडलेला व्हेनेझुएला राजकीय अस्थैर्याचाही सामना करीत असून, यामुळे सदर निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. मात्र ही निवडणूक निष्पक्ष नसल्याचे आरोप केले जात आहेत. अमेरिकेनेही व्हेनेझुएलातील या निवडणुकीचा निकाल मान्य करणार नसल्याची घोषणा केली आहे.

व्हेनेझुएलाच्या सरकारमधील दुसर्‍या क्रमांकाचे नेते ‘दिओस्दादो काबेल्लो’ व त्यांची पत्नी मार्लेनी व बंधू ‘जोस डेव्हिड काबेल्लो’ यांच्यावर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनुसार त्यांची परदेशातली बँक खाती व मालमत्ता गोठविली जाईल. या निर्बंधांच्या कचाट्यात व्हेनेझुएलाच्या आणखी काही नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. रविवारी होणार्‍या निवडणुकीच्या दोन दिवस आधी अमेरिकेने या निर्बंधांची घोषणा करून व्हेनेझुएलाच्या सत्ताधारी पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी अमेरिका आपले सरकार उलथण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सातत्याने करीत आले आहेत.

लॅटिन अमेरिकेतील इंधनसंपन्न देश असलेला व्हेनेझुएला सध्या भयंकर आर्थिक संकटात सापडला आहे. व्हेनेझुएलाचे चलन ‘बोलिव्हर’ची भयंकर घसरण झाली असून यामुळे भडकलेल्या महागाईने जनता हैराण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत ९९.९९ टक्क्यांपर्यंत झालेल्या या घसरणीचे विदारक परिणाम व्हेनेझुएलामध्ये दिसू लागले असून यामुळे सरकारच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू झाली होती. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदुरो यांचे सरकार धडपडत असून इंधनावर आधारलेल्या ‘पेट्रो’ या नव्या चलनाची घोषणा राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी केली होती. याने या देशासमोर संकट टळलेले नाही.

२०१८ सालात व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था १५ टक्क्यांनी घसरेल व २०२२ सालापर्यंत या देशातील बेकारी ३६ टक्क्यांनी वाढेल, असा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केला आहे. अमेरिकेने आपल्या देशावर आर्थिक युद्ध लादल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचे राष्ट्राध्यक्ष मदुरो यांचे म्हणणे आहे. व्हेनेझुएलाच्या या आर्थिक समस्यांचे मूळ राजकीय अस्थैर्यामध्ये असल्याचे समोर येत आहे. २०१३ साली व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन झाले होते. प्रखर अमेरिकाविरोधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चावेझ यांच्यानंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या मदुरो यांनीही आपली अमेरिकाविरोधी धोरणे कायम ठेवली.

मात्र मदुरो यांच्या कार्यकाळात इंधनाचे दर खाली आल्यानंतर व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट झाली होती. त्यातच अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाला धारेवर धरणारे आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावल्याचे दिसत आहे. ट्रम्प प्रशासनाने टाकलेल्या नव्या निर्बंधांनुसार व्हेनेझुएलाचे प्रमुख नेत्यांना लक्ष्य करण्यात आले असून पुढच्या काळात या निर्बंधांची व्याप्ती अधिकच वाढेल, असा दावा केला जातो.

दरम्यान, ब्राझिल, कोलंबिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांचा शेजार आणि २८०० किलोमीटर इतकी विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेला व्हेनेझुएला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, समावेशक व मुक्त संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. व्हेनेझुएला इंधनउत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’चा सदस्य आहे. म्हणूनच या देशातील आर्थिक व राजकीय अस्थैर्य इतर लॅटिन अमेरिकन देशांवर मोठा प्रभाव टाकताना दिसत आहे.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/998259704961818624
https://www.facebook.com/WW3Info/posts/395928244148999