चीनला ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत जबरदस्त उलथापालथ होईल

चीनला ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत जबरदस्त उलथापालथ होईल

बीजिंग/वॉशिंग्टन, दि. ७ (वृत्तसंस्था) – अमेरिकेने चीनला ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ चा(चलनात जाणूनबुजून छेडछाड करणारा देश) दर्जा दिल्याने आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था क्षीण होण्याचा गंभीर धोका असून बाजारपेठेतील स्थैर्याला सुरुंग लागेल, असा खरमरीत इशारा चीनच्या मध्यवर्ती बँकेने दिला. दोन दिवसांपूर्वी चीनने आपले चलन ‘युआन’चे मूल्य प्रति डॉलर सातपर्यंत खाली आणले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर घणाघाती टीका करून ‘फेडरल रिझर्व्ह’ अशा गोष्टींकडे लक्ष देत आहे का, असा टोला लगावला होता.

‘करन्सी मॅनिप्युलेटर’, आरोप, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था, व्यापारयुद्ध, अमेरिका, ‘फेडरल रिझर्व्ह’राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर केलेल्या टीकेनंतर अमेरिकेच्या कोषागार विभागाने तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. मंगळवारी अमेरिकेचे अर्थमंत्री स्टिव्ह एम्नुकिन यांनी चीन हा ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ असल्याचे जाहीर केले. अमेरिकेकडून चीनला असा दर्जा देऊन कारवाई सुरू करण्याची इतिहासातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९९४ साली तत्कालिन अमेरिकी प्रशासनाने चीनची ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ अशी संभावना करून कारवाई सुरू केली होती.

ट्रम्प यांनी २०१६ साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनकडून होणार्‍या अमेरिकेच्या लुटीचा उल्लेख केला होता. चीन चलनाचे मूल्य कमी ठेऊन अमेरिकी अर्थव्यवस्थेवर दरोडा टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपण सत्तेवर आल्यास चीनला ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ म्हणून जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र गेल्या दोन वर्षात ट्रम्प यांनी तशी कारवाई केली नव्हती.मात्र चीनने आपल्या चलनाचे केलेले अवमूल्यन ट्रम्प यांच्यासाठी निर्णायक घटना ठरली. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी या घटनेनंतर चीनवर जोरदार आरोप करून तो चलनाशी छेडछाड करीत असल्याचा दावा केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने ‘करन्सी मॅनिप्युलेटर’चा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

चीनने आपल्या चलनाच्या बाबतीत अवमूल्यनाचा निर्णय घेऊन व्यापारयुद्धात ‘चलन’ शस्त्र म्हणून वापरण्यात येईल, याचे संकेत दिले होते. अमेरिकेने ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ म्हणून जाहीर केलेला निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप चीनच्या मध्यवर्ती बँकेने केला. त्याचवेळी अशा निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होऊ शकते, असेही बजावले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info