Breaking News

तिसरे महायुद्ध मानव समुदायाचा सर्वनाश करील

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मानव समुदायमॉस्को – ‘तिसरे महायुद्ध मानव समुदायाचा सर्वनाश घडवून आणेल’, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला आहे. हा इशारा देत असताना, अमेरिकेकडून घेतले जाणारे निर्णय तिसर्‍या महायुद्धाचा धोका अधिकच तीव्र करीत आहेत, असा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. असे असले तरी ‘रशिया व अमेरिकेमधील सामरिक समतोल ढासळविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न रशिया कधीही खपवून घेणार नाही, रशिया त्याला प्रत्युत्तर देईलच’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले आहे.

रशियातील एका टीव्ही वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी महायुद्धाच्या भयंकर परिणामांची जाणीव करून दिली. ‘तिसरे महायुद्ध कुठल्या शस्त्रांनी लढले जाईल, ते ठाऊक नाही. पण चौथे महायुद्ध मात्र दगडधोंडे आणि काठ्यांनी लढले जाईल’ असे विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी म्हटले होते. त्यांच्या या उद्गारांचा दाखला देऊन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तिसर्‍या महायुद्धामुळे संपूर्ण मानवी समुदायाचा सर्वनाश होईल, अशी भीती व्यक्त केली. त्याचवेळी शीतयुद्धाच्या काळात असा सर्वनाश झाला नाही, याचे कारण दोन्ही महासत्तांना आपल्या कृतीतून भयंकर नरसंहार होईल, याची जाणीव होती, असे व्लादिमिर पुतिन म्हणाले.

मात्र अलीकडच्या काळात अमेरिकेने घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे परिस्थिती भयावह बनली आहे, असा ठपका रशियन राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. रशियाबरोबर केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या करारातून अमेरिकेने माघार घेतली. तसे करून अमेरिकेला रशियाबरोबरील सामरिक समतोल बिघडवायचा आहे. पण रशिया हे कधीही सहन करणार नाही, असे पुतिन म्हणाले. तसेच ‘अमेरिकेने एकतर्फी निर्बंध लादून यावर रशियाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले’, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. रशियाने फार आधीच अमेरिकेच्या वर्चस्ववादाच्या विरोधात इशारे दिले होते. पण आता व्यापारयुद्ध समोर खडे ठाकल्यानंतर युरोपिय देशांना याची जाणीव झाली आहे, असा टोला पुतिन यांनी लगावला.

रशियाचे शेजारी असलेले बाल्टिक देश अमेरिकेचे लष्करी सहाय्य घेत आहेत. त्यांनाही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी खडसावले असून त्यांच्या या धोरणामुळे परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी अधिकच बिकट बनत चालली आहे, असा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. दरम्यान, रशियन वृत्तवाहिनीवरील या कार्यक्रमात सर्वसामान्य प्रेक्षक फोनवरून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना प्रश्‍न विचारत होते व पुतिन या प्रश्‍नांना सविस्तर उत्तरे देत होते. पण हा सारा कार्यक्रम म्हणजे बनाव होता, अशी टीका एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केली आहे. मॉस्कोमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पुतिन यांना प्रश्‍न करणार्‍यांना ट्रेनिंग देण्यात आले होते, असा दावा सदर वृत्तवाहिनीने केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रशियन राष्ट्राध्यक्ष आक्रमक विधाने करून जगाच्या चिंतेत भर घालत आहेत. रशियाकडील अण्वस्त्रांच्या मार्‍यापासून जगातला कुठलाही देश सुरक्षित राहू शकत नाही, असे पुतिन यांनी बजावले होते. तसेच रशियावर अणुहल्ला झाला तर सारे जग भस्मसात करण्याची क्षमता रशियाकडे आहे, असेही पुतिन यांनी बजावले होते. तर अणुहल्ल्यामुळे रशिया या भूतलावर राहणार नसेल, तर उरलेले जग कशासाठी शिल्लक ठेवायचे? असा प्रश्‍नही पुतिन यांनी विचारला होता. याच्या बरोबरीने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून रशियाच्या लष्करी सामर्थ्याचे जोरदार प्रदर्शन केले जात आहे. यामुळे त्यांच्या विधानांचे गांभीर्य अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/1005071428595564544
https://www.facebook.com/WW3Info/posts/402631483478675