Breaking News

सौदी व मित्रदेशांनी येमेनवरील हल्ले तीव्र केले

सना – सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांनी येमेनच्या ‘हौदेदा’ बंदरावरील जोरदार आक्रमण चढवून हौथी बंडखोरांवरील हल्ले तीव्र केले आहेत. तर सौदीच्या या हल्ल्यांमुळे येमेनमधील मानवतावादी सहाय्यावर परिणाम होण्याची चिंता मानवाधिकार संघटना व्यक्त करीत आहेत.

सौदीगेल्या काही आठवड्यांपासून येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदीच्या सीमाभागात जोरदार रॉकेट तसेच क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू आहेत. यातील काही क्षेपणास्त्रे सौदीची राजधानी रियाधपर्यंत पोहोचली होती. या व्यतिरिक्त हौथी बंडखोरांनी एडनच्या आखातात तैनात असलेल्या संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि इजिप्तच्या विनाशिकांच्या दिशेनेही रॉकेट हल्ले चढविले होते.

हौथी बंडखोरांच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सौदी व अरब मित्रदेशांनी येमेनच्या सीमारेषेजवळ कारवाई सुरू केली. तसेच हौदेदा या व्यापारी बंदर शहराचा ताबा घेणार्‍या हौथी बंडखोरांना माघार घेण्यासाठी २४ तासांची मुदतही दिली होती. पण हौथी बंडखोरांनी हौदेदा शहर रिकामे करण्यास नकार दिल्यामुळे मंगळवारपासून सौदी व मित्रदेशांनी हवाई हल्ले सुरू केले.

गेल्या काही तासांपासून सौदी व मित्रदेशांनी हौदेदा व आजुबाजूच्या भागावरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. येमेनमधील माध्यमांनी सौदी व मित्रदेशांच्या या हल्ल्यांच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. सौदी व मित्रदेशांचे लष्कर, नौदल व वायुसेना एकाचवेळी हौदेदा शहरातील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांना लक्ष्य करीत आहेत. यामुळे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या हौदेदावर ताबा मिळविल्यास हौथी बंडखोरांची गळचेपी होईल, असा दावा सौदीची माध्यमे करीत आहेत.

हौथी बंडखोरांनी येमेनच्या सत्तेतून खाली खेचलेल्या आणि सौदीमध्ये आश्रय घेतलेल्या राष्ट्राध्यक्ष अब्द मन्सूर हादी यांनी ‘हौदेदा’वरील हल्ल्याचे समर्थन केले. येमेनमधील इराणसमर्थक हौथी बंडखोरांच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी हौदेदावरील कारवाई महत्त्वाची असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष हादी यांनी दिली. हौथी बंडखोरांविरोधात राजकीय स्तरावर प्रयत्न केल्यानंतर लष्करी कारवाईचा पर्याय शिल्लक असल्याचा दावा हादी यांनी केला.

पण मानवाधिकार संघटना आणि इराण सौदीच्या हौदेदावरील हल्ल्यावर जोरदार टीका करीत आहेत. सौदी व मित्रदेशांच्या कारवाईमुळे हौदेदा बंदरातून येमेनी जनतेसाठी पाठविण्यात येणार्‍या मानवतावादी सहाय्याची कोंडी होऊ शकते, अशी चिंता मानवाधिकार संघटना व्यक्त करीत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info