चलनयुद्धात डॉलर कोसळल्यास सोन्यातील गुंतवणूकच बचाव करील – विख्यात तज्ज्ञ क्लाडिओ ग्रास यांचा दावा

चलनयुद्धात डॉलर कोसळल्यास सोन्यातील गुंतवणूकच बचाव करील – विख्यात तज्ज्ञ क्लाडिओ ग्रास यांचा दावा

मॉस्को – ‘‘जगभरात चलनयुद्ध सुरू आहे. या चलनयुद्धात अमेरिकन डॉलर कोसळण्याची दाट शक्यता आहे. याच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी ‘आपल्या ताब्यात असलेले खरेखुरे सोने’ हा एकमेव पर्याय ठरतो’’, असे विख्यात विश्‍लेषक ‘क्लाडिओ ग्रास’ यांनी बजावले आहे. अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांकडे असलेले राजकीय व आर्थिक सामर्थ्य आता पूर्वेकडील देशांकडे येऊ लागल्याने जगात फार मोठ्या उलथापालथी होतील, असा इशाराही ग्रास यांनी दिला.

डॉलरमौल्यवान धातूंमधील गुंतवणुकीबाबतचे तज्ज्ञ असलेल्या ‘क्लाडिओ ग्रास’ यांनी एका रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चलनयुद्ध आणि त्याच्या अपरिहार्य परिणामांची जाणीव करून दिली. सध्या जगात चलनयुद्ध सुरू झाले आहे, असे ग्रास यांनी ठामपणे सांगितले असून या चलनयुद्धामुळे सध्याचे जागतिक चलन असलेला अमेरिकन डॉलर कोसळू शकतो. जगभरातील देशांची सुमारे ६५ टक्के इतकी परकीय चलनाची गंगाजळी अमेरिकन डॉलर्समध्ये आहे, याची आठवण करून देऊन ग्रास यांनी डॉलर कोसळल्यास भयंकर आर्थिक उत्पात माजेल, असा निष्कर्ष नोंदविला आहे.

‘जागतिक अर्थव्यवस्थेवरील कर्ज सुमारे २३० लाख कोटी डॉलर्सवर पोहोचले आहे, याचीही जाणीव ग्रास यांनी करून दिली. तसेच राजकीय व सामरिक परिस्थितीही बदलत चालली असून शीतयुद्ध संपले आहे. यामुळे युरोपिय देशांना आता रशियाचे भय उरलेले नाही. म्हणूनच रशियापासून आपल्या सोन्याच्या प्रचंड साठ्याचे रक्षण करण्यासाठी हे सोने अमेरिकेत ठेवणार्‍या युरोपिय देशांनी हे सोने परत घेण्यास सुरुवात केली आहे. जर्मनी, तुर्की आणि नेदरलँड या देशांनी अमेरिकेतला सोन्याचा साठा मायदेशी आणण्यास सुरुवात केली आहे’ याची नोंद ‘क्लाडिओ ग्रास’ यांनी केली.

‘पहिल्या व दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका जगातील सर्वात सामर्थ्यशाली देश बनला. कारण मुक्त मानल्या जाणार्‍या देशांकडे असलेले सुमारे ७० टक्के इतके सोने अमेरिकेच्या ताब्यात आले होते. यामुळे अमेरिकन डॉलरला जागतिक चलनाचा दर्जा मिळाला. मात्र गेल्या ३० वर्षांपासून आपण अतिशय वेगळा अनुभव घेत आहोत’ याकडे ‘क्लाडिओ ग्रास’ यांनी लक्ष वेधले. प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँका कुठलेही पाठबळ नसताना, नोटांची छपाई करीत आहेत. त्यामुळे चलनक्षेत्रात मोठ्या उलथापालथी होत असून अस्थैर्य माजले आहे, याचीही आठवण ग्रास यांनी करून दिली.

२००८ सालच्या मंदीपासून जगाला या आर्थिक अस्थैर्याने अधिकच ग्रासले असून विविध देश आर्थिक क्षेत्रात व मालमत्तेत वारेमाप पैसे गुंतवीत आहेत. या सार्‍या आर्थिक व्यवस्थेने निर्माण केलेल्या समस्या असून दशकभराच्या कालावधीत या समस्या भीषण स्वरूप धारण करीत असल्याचे दिसते, असा दावा करून यामुळे अमेरिकन डॉलरचे कोसळणे अपरिहार्य असल्याचा दावा ग्रास यांनी केला.

अमेरिकन डॉलर कोसळल्यास त्याचे भीषण परिणाम टाळण्यासाठी स्वतःच्या ताब्यात खरेखुरे सोने ठेवायला हवे, याने बरेच धोके टाळता येऊ शकतात, असे ‘क्लाडिओ ग्रास’ यांचे म्हणणे आहे. राजकीय सामर्थ्य पाश्‍चिमात्यांकडून पूर्वेकडील देशांच्या दिशेने जात आहे. हा नियमितपणे फिरणार्‍या चक्राच्या गतीचा भाग ठरतो. अशा काळात प्रत्यक्ष सोन्यातील ही गुंतवणूक अतिशय लाभदायी ठरेल, असा दावा करून ग्रास यांनी जगभरातील जनतेला सावध केले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info