Breaking News

इम्रान खान यांचा ‘नया पाकिस्तान’ भारतद्वेषी धोरण सोडणार नाही – विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात ‘काश्मीर’चा उल्लेख

इस्लामाबाद – इम्रान खान यांच्या ‘नया पाकिस्तान’मध्ये भारतासाठी काहीही नवे नसेल, हे  निवडणुकीतील विजयानंतरच्या त्यांच्या पहिल्याच भाषणात स्पष्ट झाले आहे. भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचे दावे करणार्‍या इम्रान खान यांनी ‘काश्मीर’ ही दोन्ही देशांमधील प्रमुख समस्या असल्याचे बजावले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये भारत मानवाधिकारांचे हनन करीत असल्याचा ठपका इम्रान खान यांनी ठेवला आहे. पण दहशतवादाच्या मुद्यावर इम्रान खान यांनी अवाक्षरही काढलेले नाही. त्याचवेळी भारतीय माध्यमांनी आपल्याला खलनायक ठरविल्याचे सांगून इम्रान खान यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानातील व पाकिस्तानबाहेरील विश्‍लेषकांनी केलेल्या दाव्यानुसार ‘पीटीआय’ने या निवडणुकीत आघाडी घेतली. बहुमत मिळालेले  नसले तरी पाकिस्तानचे पुढचे सरकार ‘पीटीआय’चेच असेल हे स्पष्ट झाले आहे. १२० जागांवर पीटीआयचे उमेदवार विजयी झाल्याचे सांगितले जाते. बहुमतासाठी १३७ उमेदवारांची आवश्यकता असून ‘पीटीआय’ सहजपणे बहुमत सिद्ध करू शकेल, असे चित्र दिसत आहे. मुख्य म्हणजे या निवडणुकीत पाकिस्तानच्या प्रभावशाली लष्कर व कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने ‘पीटीआय’साठी केलेले काम सर्वात महत्त्वाचे ठरले. पाकिस्तानचे लष्कर राजकारण व निवडणुकीत हस्तक्षेप करण्याची चूक वारंवार करते, अशी टीका करणारे विश्‍लेषक यावेळची चूक सर्वात घातक ठरेल, असे इशारे देत आहेत.

‘नया पाकिस्तान’, विजय, इम्रान खान, पीटीआय, काश्मीर, दहशतवाद, पाकिस्तान, अफगाणिस्तानया निवडणुकीत खूप मोठे गडबड घोटाळे झाले असून नवाझ शरीफ यांच्या पंजाबमधील प्रभावक्षेत्रात ‘पीटीआय’चे उमेदवार निवडून आले, ही धक्कादायक बाब ठरते. तसेच ‘पीटीआय’ व इम्रान खान यांचा प्रभाव नसलेल्या कराची सारख्या शहरातही ‘पीटीआय’ला मिळालेले यश संशयास्पद असल्याचा दावा केला जातो. म्हणूनच पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीचे निकाल स्वीकारण्यास नकार दिला आहे. मात्र या निवडणुकीवर घेतल्या जाणार्‍या आक्षेपांची चौकशी होईल, अशी ग्वाही देऊन इम्रान खान यांनी आपल्या टीकाकारांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

आपला विजय लोकशाही बळकट करणारा असेल व आपण देशाला स्वच्छ आणि पारदर्शी सरकार देऊ, असे आश्‍वासन इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेला दिले. पाकिस्तानात शांतता व स्थैर्य कायम राखण्यासाठी शेजारी देशांचे सहाय्य अपेक्षित असल्याचे सांगून सर्वात आधी इम्रान खान यांनी चीनबरोबरील पाकिस्तानच्या संबंधांचा उल्लेख केला.

‘सीपीईसी’ प्रकल्पद्वारे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याचे स्वप्न इम्रान खान यांनी आपल्या जनतेला दाखविले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान देखील चीनधार्जिणे धोरणच राबविणार असल्याचे उघड झाले आहे. चीन ‘सीपीईसी’ प्रकल्पाचा वापर करून पाकिस्तानला मोठ्या व्याजदराने कर्ज देत आहे व यामुळे पाकिस्तानचे सार्वभौमत्त्व धोक्यात आले आहे, अशी चिंता काही प्रगल्भ विश्‍लेषकांनी व्यक्त केली होती.

भारताबाबत बोलताना इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्‍नाचा उल्लेख केला. ‘काश्मीर प्रश्‍न बळाच्या वापराने सुटणार नाही. तो चर्चेनेच सुटेल. यासाठी चर्चा करण्यास आपले सरकार तयार असेल. भारतीय नेतृत्त्वाने यासाठी एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले पुढे येऊ’, असा दावा खान यांनी केला. पण प्रत्यक्षात काश्मीरमध्ये भारत अत्याचार करीत असल्याचे सांगून व दहशतवादाचा उल्लेख टाळून इम्रान खान यांनी आपली पावले मागे टाकल्याचेच दिसत आहे. भारतीय माध्यमांनी आपली खलनायकासारखी प्रतिमा रंगविली, अशी टीका करून इम्रान खान यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, वास्तवाचे भान नसलेला आणि पोकळ आदर्शवादी विचार मांडणार्‍या इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानची अधिकच दुर्दशा होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा एका भारतीय विश्‍लेषकाने केला आहे.

पाकिस्तानची खरी सत्ता आपल्या नाही, तर लष्कराच्या हातात आहे, याची लवकरच इम्रान खान यांना जाणीव होईल. त्यामुळे जनतेला दिलेली आश्‍वासने आपण पूर्ण करू शकत नाही, हे ही त्यांच्या लक्षात येईल. यानंतर त्यांचा स्वतःचा व पाकिस्तानी जनतेचाही भ्रमनिरास होईल, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानात शांतता व स्थैर्य राखणे आवश्यक आहे. यासाठी पाकिस्तान सहाय्य करील, अशी भूमिका इम्रान खान यांनी मांडली खरी. पण अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवून या देशाचा भारताच्या विरोधात वापर करण्याची पाकिस्तानी लष्कराची योजना यामुळे धुळीस मिळू शकते. म्हणूनच पाकिस्तानचे लष्कर तसे कधीही होऊ देणार नाही, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात अमेरिकेला सहाय्य नाकारण्याची चूक इम्रान खान यांनी केली तर त्याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, याचीही जाणीव इम्रान खान यांच्या टीकाकारांकडून करून दिली जात आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info