चीनकडून दाखविण्यात येणार्‍या चुकीच्या दिशेने पुढेे जाऊ नका – अमेरिकेचा युरोपिय देशांना इशारा

चीनकडून दाखविण्यात येणार्‍या चुकीच्या दिशेने पुढेे जाऊ नका – अमेरिकेचा युरोपिय देशांना इशारा

म्युनिक – ‘राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाखाली चीन व चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी अधिक वेगाने चुकीच्या दिशेने चालली आहे. जनतेवर सुरू असलेली दडपशाही, दुसर्‍या देशांना लुटणारी आर्थिक धोरणे आणि अत्यंत आक्रमक लष्करी हालचाली हे याचेच निदर्शक आहेत. चीनकडून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा गैरवापर सुरू असून तो आपण सर्वांनी मिळून रोखायला हवा’, अशा शब्दात अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी युरोपिय देशांना चीनची धोरणे व सहाय्यापासून लांब राहण्याबाबत बजावले.

   

जर्मनीच्या म्युनिक शहरात आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक परिषद सुरू असून त्यात जगातील प्रमुख देशांचे नेते, अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित आहेत. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, सभापती नॅन्सी पेलोसी, वरिष्ठ नेते लिंडसे ग्रॅहम परिषदेत सहभागी झाले आहेत. या सर्व नेत्यांनी परिषदेत केलेल्या वक्तव्यांमध्ये चीनविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडली. त्यातही संरक्षणमंत्री एस्पर व परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरली.

चीनची तुलना रशिया व इराणशी करून या दोन देशांइतकाच चीनही अमेरिका व युरोपसाठी धोका असल्याचे पॉम्पिओ यांनी बजावले. यावेळी त्यांनी चीनशी निगडित पाच गोष्टींचा उल्लेख करून या मुद्यांवर युरोपने योग्य सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला. त्यात ‘हुवेई’ कंपनी, चीनच्या सागरी महत्त्वाकांक्षा, तैवान व हॉंगकॉंगचा आवाज बंद करण्याच्या हालचाली, अमेरिका तसेच युरोपच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न आणि आर्क्टिकमधील वाढता प्रभाव यांचा समावेश आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले तीन वर्ष सातत्याने चीनविरोधात आग्रही भूमिकेचा पुरस्कार केला आहे. चीनबरोबर छेडलेले व्यापारयुद्ध, तैवानच्या मुद्यावर घेतलेले निर्णय, चीनच्या विरोधात विविध देशांची आघाडी उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार, चीनच्या कंपन्यांना रोखण्यासाठी दिलेले आदेश यासारख्या घटना ट्रम्प यांचा प्रखर चीनविरोध स्पष्ट करणार्‍या आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या धोरणाचा अमेरिकेच्या इतर नेत्यांकडून पुनरुच्चार करण्यात येत असून परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी त्यात आघाडी घेतली आहे.

गेल्या सहा महिन्यात पॉम्पिओ यांनी अमेरिकेतील विविध कार्यक्रमांसह, परदेश दौरे तसेच आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सातत्याने चीनच्या वाढत्या स्पर्धेला व चीनने उभ्या केलेल्या आव्हानांना लक्ष्य केले आहे. म्युनिक सुरक्षा परिषदेसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही आक्रमक भाषेत चीनविरोधी भूमिका मांडून त्यांनी धोरणात बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी प्रत्युत्तर दिले.

अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांकडून चीनवर टीकास्त्र सोडण्यात आले असून हे नेते कुठेही गेले तरी त्याच त्याच गोष्टी उगाळत राहतात, असा टोला चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला. त्याचवेळी अमेरिकी नेत्यांची वक्तव्ये खोटी असल्याचा दावाही वँग यि यांनी केला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info