Breaking News

युरोपिय संसदेच्या निवडणुकीत ‘ख्रिश्‍चन लोकशाही’चा विजय होईल – हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन

बुखारेस्ट – पुढील वर्षी होणार्‍या युरोपिय संसदेच्या निवडणुकीत ‘ख्रिश्‍चन लोकशाही’ युरोपला विविध संस्कृतींचे मिश्रण बनविणार्‍या ‘बहुसांस्कृतिकवाद’ विचारसरणीला पराभूत करेल, असा खरमरीत इशारा हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी दिला. सध्या युरोपचे नेतृत्त्व करणारा उच्चभ्रू व उदारमतवादी वर्ग चिंतित झाला असून त्यांची सत्तेतून जाण्याची वेळ जवळ आली आहे, असेही ऑर्बन यांनी बजावले.

‘ख्रिश्‍चन लोकशाही’, विजय, बहुसांस्कृतिकवाद, निर्वासित, युरोपचे रूपांतर, हंगेरी, अँजेला मर्केलयुरोपमध्ये २०१९ साली मे महिन्यात संसदेची निवडणूक होत असून, ही निवडणूक युरोपिय महासंघाच्या भवितव्याबाबत निर्णायक ठरेल, अशा स्वरूपाची भाकिते विविध विश्‍लेषक व तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरात युरोपात निर्वासितांची समस्या अधिकाधिक चिघळत असून त्याविरोधात जनतेतील असंतोष तीव्र होत चालल्याचे समोर येत आहे. युरोपिय महासंघातील प्रमुख देश असणार्‍या जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, इटली, पोलंड, हंगेरी, झेक रिपब्लिक, नेदरलॅण्ड यासारख्या अनेक देशांमध्ये राजकीय पातळीवरही त्याचे जबरदस्त पडसाद उमटले आहेत.

निर्वासितांना विरोध करणार्‍या राजकीय गटांना जनतेचा स्पष्ट कौल मिळत असून त्यांचे स्वागत करणार्‍या नेत्यांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना निर्वासितांच्या मुद्यावर घ्यावी लागलेली माघार हा त्यातील निर्णायक टप्पा मानला जातो. याच पार्श्‍वभूमीवर निर्वासितांना विरोध करणार्‍या उजव्या गटांना एकत्र आणण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून त्यासाठी फ्रेंच नेत्या ‘मरिन ली पेन’, हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन, ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर ‘सेबॅस्टियन कर्झ’, इटलीचे अंतर्गत सुरक्षामंत्री मॅटिओ सॅल्व्हिनी यासारख्या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

‘ख्रिश्‍चन लोकशाही’, विजय, बहुसांस्कृतिकवाद, निर्वासित, युरोपचे रूपांतर, हंगेरी, अँजेला मर्केलकाही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टिव्ह बॅनन यांनीही युरोपचा दौरा करून ‘द मुव्हमेंट’ नावाचा गट स्थापन केल्याची घोषणा केली होती. ही घोषणा म्हणजे 2019 साली होणार्‍या युरोपिय संसदेच्या निवडणुकांसाठी उजव्या विचारसरणीच्या या गटांची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मानले जातात. या पार्श्‍वभूमीवर हंगेरीच्या पंतप्रधानांनी रोमानियातील हंगेरियन वंशाच्या समुदायाला उद्देशून केलेले भाषण लक्ष वेधून घेणारे ठरते.

‘युरोपिय महासंघातील सध्याचे नेतृत्त्व सदस्य देशांना निर्वासितांच्या समस्येपासून सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता त्यांची सत्तेवरून जाण्याची वेळ आली आहे. या नेतृत्त्वाला सध्याच्या युरोपचे रूपांतर ख्रिश्‍चनांच्या कालखंडानंतरच्या युरोपात करायचे आहे. या कालखंडात युरोपिय देश नाहीसे होणार आहेत. पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकांच्या माध्यमातून या प्रक्रियेला सुरुंग लावला जाऊ शकतो. युरोपचे रूपांतर रोखणे आपल्याच हिताचे आहे’, असे ऑर्बन यांनी बजावले.

‘युरोपिय महासंघ उदारमतवादी मूल्ये आणि विविध संस्कृतीचे मिश्रण असलेल्या बहुसांस्कृतिक युरोपला प्रोत्साहन देत आहे. मात्र येत्या निवडणुकीत ख्रिश्‍चन लोकशाहीपुढे हे सर्व कोसळून पडेल’, असा दावा हंगेरीच्या पंतप्रधानांनी केला. ही ख्रिश्‍चन लोकशाही रूढ अर्थाने उदारमतवादी नाही, असे सांगून याचा निर्वासित व बहुसांस्कृतिकवादाबरोबरच कम्युनिस्ट मूल्यांनाही विरोध असल्याचे पंतप्रधान ऑर्बन यांनी स्पष्ट केले.

English  हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info