Breaking News

मानवाधिकाराच्या मुद्यावरून सौदी व कॅनडामध्ये राजनैतिक युद्ध पेटले

रियाध/टोरोन्टो – सौदी अरेबियाने मानवाधिकारांसाठी कार्य करणार्‍या ‘समर बदावी आणि रैफ बदावी’ यांना अटक केल्यानंतर सौदी व कॅनडामध्ये राजनैतिक संघर्ष पेटला आहे. सौदीच्या व्यवस्थेवर टीका करणार्‍या कॅनडाबरोबरील विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय सौदीने घोषित केला. तसेच कॅनडामधील आपल्या विद्यार्थ्यांना मायदेशी बोलावून सौदी या प्रकरणी निषेध व्यक्त करणार आहे. याबरोबर आपल्या आर्थिक नुकसानाची पर्वा न करता सौदी अरेबिया कॅनडातील आपली गुंतवणूक मागे घेण्याचीही तयारी करीत आहे.

काही दिवसांपूर्वी सौदीच्या व्यवस्थेवर टीका करणार्‍या बदावी बंधूभगिनीला सौदीच्या यंत्रणेने अटक केली होती. त्यांच्या या अटकेविरोधात कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री ‘क्रिस्तिया फ्रीलँड’ यांनी सौदीवर टीका केली होती. सौदीकडून मानवाधिकार तसेच महिलांच्या अधिकारांचे सातत्याने उल्लंघन सुरू असल्याचा आरोप कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता. कॅनेडियन परराष्ट्रमंत्र्यांच्या या टीकेवर सौदीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. कॅनडा सौदीच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करीत असल्याची टीका करून सौदीने रियाधमधील कॅनडाच्या राजदूतांची हकालपट्टी केली.

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री फ्रीलँड यांनी सौदीच्या या कारवाईवर पुन्हा एकदा टीका करून कॅनडा नेहमीच मानवाधिकारांच्या समर्थनार्थ उभा राहील, असे जाहीर केले. त्यानंतर सौदीने कॅनडाबरोबरचे राजकीय तसेच व्यापारी सहकार्य गोठविण्याचे जाहीर केले. तसेच सौदी व कॅनडातील विमानसेवाही बंद करण्याची घोषणा केली. १३ ऑगस्टपासून ही विमानसेवा बंद करण्यात येणार असून सौदीतील कॅनेडियन पर्यटकांमध्ये यामुळे गोंधळ उडाला आहे.

तर कॅनडात शिक्षण घेतलेल्या सौदीच्या विद्यार्थ्यांनाही मायदेशी परतण्याची सूचना करण्यात आली आहे. सौदीचे सुमारे सात हजाराहून अधिक विद्यार्थी कॅनडामध्ये आहेत. या विद्यार्थ्यांना अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे संकेत सौदीने दिले आहेत. या व्यतिरिक्त सौदीने कॅनडाला देणार्‍या येणारे वैद्यकीय सहाय्य देखील मागे घेण्याचे जाहीर केले.

सौदीने एकामागोमाग एक आक्रमक निर्णय घेऊन कॅनडाबरोबर जोरदार राजनैतिक युद्ध छेडल्याचे दिसत आहे. येत्या काळात सौदी कॅनडातील आपली गुंतवणूक देखील मागे घेऊ शकतो, असा दावा ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने केला. सौदीने आपल्या परदेशातील मालमत्तेचे व्यवस्थापन करणार्‍यांना कॅनडातील इक्विटी, बॉन्ड कमी किंमतीत विकण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कितीही आर्थिक नुकसान झाले, तरी त्याची पर्वा नसल्याची सूचना सौदीने आपल्या अधिकार्‍यांना केली आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info