Breaking News

व्हेनेझुएलामध्ये लष्करी हस्तक्षेपाचा पर्याय उपलब्ध – ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स’च्या प्रमुखांची घोषणा

कुकूटा – ‘मदुरो राजवटीमुळे व्हेनेझुएलातील जनतेची परवड सुरूच राहणार असेल तर व्हेनेझुएलाबाबत काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. यामध्ये व्हेनेझुएलात लष्करी हस्तक्षेप करण्याचा पर्यायही समोर असेल’, अशी घोषणा ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स’चे (ओएएस) प्रमुख ‘लुईस अल्माग्रो’ यांनी केली. तसेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मदुरो हे हुकूमशहा असल्याचा ठपका अल्माग्रो यांनी ठेवला.

व्हेनेझुएलाच्या चलनाची 99 टक्क्यांनी घसरण झाली असून अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची टंचाई निर्माण झाली आहे. व्हेनेझुएलाच्या जनतेची दिवसेंदिवस अधिकाधिक परवड होत असून या देशातील 80 टक्के नागरिक अन्नान दशेत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. व्हेनेझुएलायातील या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष मदुरो यांची राजवट व चुकीची अर्थनिती जबाबदार असल्याची टीका विरोधक तसेच जनता करीत आहे.

पण मदुरो यांचे सरकार देशातील या परिस्थितीसाठी इतर देशांवर कटकारस्थानांचे आरोप करीत आहेत. अमेरिका तसेच शेजारी लॅटिन अमेरिकी देशांनी मिळून व्हेनेझुएलाला आर्थिक संकटात ढकलल्याचा आणि आपले सरकार उलथण्यासाठी कारस्थान रचल्याचा ठपका मदुरो यांनी ठेवला आहे. मात्र मदुरो यांच्या या भूमिकेमुळे व्हेनेझुएलामध्ये अस्थैर्य व अराजक निर्माण झाले असून त्याचा परिणाम शेजारी लॅटिन अमेरिकी देशांवर होत असल्याची टीका होत आहे. मदुरो राजवटीवरील अविश्‍वासामुळे व्हेनेझुएलातील लाखो नागरिक ब्राझिल, पेरू, इक्वेडोर व चिली या शेजारी देशांकडे धाव घेत?असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी ‘ओएएस’चे प्रमुख अल्माग्रो यांनी व्हेनेझुएलाच्या सीमाजवळच्या भागाला भेट दिली. अमेरिका खंडातील 35 देशांचा समावेश ‘ओएएस’मध्ये आहे. या भेटीत अल्माग्रो यांनी व्हेनेझुएलातील परिस्थितीसाठी मदुरो राजवट जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. तसेच मदुरो राजवटीचे परिणाम ब्राझिल, पेरू, इक्वेडोर, चिलीसह कोलंबिया, अर्जेंटिना आणि अमेरिकी खंडातील इतर देशांच्या सीमासुरक्षेवर येत असल्याचा आरोप अल्माग्रो यांनी केला. हे संकट टाळण्यासाठी ‘ओएएस’ वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करीत आहे. यामध्ये व्हेनेझुएलात?लष्करी हस्तक्षेपचा पर्यायाचा समावेश असल्याची माहिती अल्माग्रो यांनी दिली.

दरम्यान, अल्माग्रो हे अमेरिकेच्या ‘सीआयए’चे एजंट असल्याचा आरोप मदुरो यांनी केला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info