अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट उधळला – अमेरिकेच्या चॅनेलची माहिती

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट उधळला – अमेरिकेच्या चॅनेलची माहिती

वॉशिंग्टन – आक्रमक धोरणांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय टीकेचे लक्ष्य ठरत असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प गेल्या वर्षी फिलिपाईन्सच्या दौर्‍यावर असताना ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी हा कट आखला होता. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या ‘सिक्रेट सर्व्हिस’ने हा कट उधळल्यामुळे ट्रम्प यांच्यावरील संकट टळले, असा दावा अमेरिकेतील प्रख्यात चॅनेलने केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती समोर आली होती. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन याआधी अमेरिकेतील धर्मोपदेशकांनी केले होते.

अमेरिकी चॅनेलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला असलेला धोका आणि त्यांचे सुरक्षा रक्षक बजावत असलेली कामगिरी याची माहिती दिली आहे. यामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फिलिपाईन्सची राजधानी ‘मनिला’ येथे आग्नेय आशियाई देशांच्या ‘असियान’ची बैठकीतील कटाचा उल्लेख केला आहे. या बैठकीसाठी विशेष अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील उपस्थित होते.

सदर बैठकीसाठी फिलिपाईन्सला रवाना होण्याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी संभाव्य धोक्याचा शोध घेतला. त्यावेळी सोशल मीडियावर ‘ली हार्वे ओस्वाल्ड’ नामक व्यक्तीचे बनावट अकाऊंट आढळले. या बनावट ‘ओस्वाल्ड’च्या अकाऊंटवरुन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट झाले, तसेच ती व्यक्ती ‘आयएस’शी संबंधित असल्याची माहिती अमेरिकेच्या सुरक्षा रक्षकांना मिळाली. ‘ली हार्वे ओस्वाल्ड’ हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा मारेकरी होता. त्यामुळे ओस्वाल्डच्या नावाच्या बनावट अकाऊंटवरुन अमेरिकी सुरक्षा यंत्रणांचा संशय बळावला व त्यांनी सखोल चौकशी केली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राहत असलेल्या हॉटेल जवळच असलेल्या हॉटेलमध्ये संबंधित दहशतवादी व त्याचे साथीदार दडून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकी सुरक्षा यंत्रणा व फिलिपाईन्सच्या पोलिसांना दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. अमेरिकी सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवावरचा धोका टळला, असे या माहितीपटात म्हटले आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या ‘स्पेशल एजंट रॅगन’ यांनी ही माहिती दिली. या कारवाईत फिलिपाईन्सच्या सुरक्षा यंत्रणांनी मोठे सहाय्य केल्याचे रॅगन यांनी स्पष्ट केले.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाबाबतची माहिती सुरक्षा यंत्रणांनी उघड केली नव्हती. पण अमेरिकी चॅनेलच्या या डॉक्युमेंट्रीमुळे वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील हत्येचा कट जगासमोर आल्यामुळे माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांना सत्तेवर येऊन दोन वर्षेही पूर्ण झालेली नाहीत. या कालावधीत त्यांच्या हत्येचे दोन प्रयत्न उधळले असून ते माध्यमांसमोर आले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना फार मोठा धोका संभवतो असा दावा अमेरिकन व पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

 English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info