Breaking News

इराणच्या अणुकार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी सौदी अरेबियाकडून पहिल्या अणुभट्टीची पायाभरणी

रियाध – सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत सौदीच्या पहिल्या अणुभट्टीची पायाभणी झाली. सौदी अरेबियातील ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या अणुभट्टीचा वापर केला जाईल, असे सौदीच्या सरकारी माध्यमांनी जाहीर केले आहे. पण इराण अण्वस्त्रसज्ज झाला तर सौदी मागे राहणार नाही, असा इशारा सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी मे महिन्यात दिला होता. त्यांच्या या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर सौदीच्या या अणुभट्टीकडे पाहिले जाते.

गेल्या वर्षी सौदीने आपला स्वतंत्र अणुकार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले होते. इंधनावर आधारलेल्या सौदीच्या अर्थव्यवस्थेला पर्यायी ऊर्जेचा वापर आवश्यक असल्याचे सांगून प्रिन्स मोहम्मद यांनी अणुप्रकल्प सुरू करण्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर, सौदीने 16 अणुभट्ट्या उभारून कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती. यापैकी पहिल्या अणुभट्टीच्या निर्मितीची पायाभरणी सोमवारी प्रिन्स मोहम्मद यांच्या उपस्थितीत झाली.

इंधन आणि गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अणुऊर्जेसाठी प्रयत्न सुरू केल्याचा दावा सौदी करीत आहे. सौदीच्या सरकारी माध्यमांनी देखील सदर अणुभट्टीची उभारणी ही नागरी वापरासाठी असल्याचे जाहीर केले. पण सौदीच्या अणुप्रकल्प निर्मितीच्या निर्णयावरच इराण तसेच काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. मुबलक इंधन व गॅसचा साठा असणार्‍या सौदीने अणुप्रकल्प उभारल्यास आखातात अणुस्पर्धा भडकेल, असा दावा करण्यात येत होता.

पण अणुप्रकल्पाची निर्मिती फक्त ऊर्जेसाठीच असल्याचे प्रिन्स मोहम्मद यांनी स्पष्ट केले होते. तसेच आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून सौदी आपला अणुकार्यक्रम राबविणार असल्याचेही सौदीने जाहीर केले होते. मात्र आंतरराष्ट्रीय समुदाय इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखू शकणार नसेल तर सौदीलाही स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रसज्ज होण्यापासून कुणीही रोखू शकत नसल्याचा इशारा प्रिन्स मोहम्मद यांनी दिला होता. यासाठी सौदीने पाकिस्तानकडून अण्वस्त्रे मिळविण्याची तयारी केल्याचेही वृत्त होते. त्यामुळे सौदीची ही अणुभट्टी आखातात आण्विक स्पर्धा सुरू झाल्याचा इशारा सार्‍या जगाला देत असून नजिकच्या काळात याचे भयंकर परिणाम होऊ शकतात.

हिंदी  English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info