Breaking News

‘ब्रेक्झिट’ नाकारून दुसरे सार्वमत घेतल्यास ब्रिटनमध्ये फ्रान्सप्रमाणे हिंसाचार भडकेल

लंडन  – ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे व युरोपिय महासंघात झालेल्या ‘ब्रेक्झिट’ करारावर संसदेत होणार्‍या मतदानाला काही तास उरले असतानाच, त्यावरून होणारा संघर्ष अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. ब्रिटनचे माजी मंत्री व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते इयान डंकन स्मिथ यांनी, ब्रेक्झिट नाकारून पुन्हा सार्वमताचा पर्याय समोर आल्यास ब्रिटनमध्ये फ्रान्सप्रमाणे दंगली भडकतील, असा खरमरीत इशारा दिला. पंतप्रधान थेरेसा मे यांनीही या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली असून आपण सादर केलेल्या कराराशिवाय ब्रिटनसमोर इतर कोणताही पर्याय नसल्याचे बजावले आहे.

मंगळवारी 11 डिसेंबरला ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्झिट’च्या करारावर मतदान घेण्यात येणार आहे. पंतप्रधान मे यांच्याकडून तयार करण्यात आलेला व महासंघाने मान्यता दिलेला करार संसदेत फेटाळला जाईल, असे संकेत गेल्या काही आठवड्यात मिळाले आहेत. सत्ताधारी पक्षातील जवळपास 100हून अधिक संसद सदस्यांनी याला विरोध केला असून विरोधी पक्षांनीही कराराविरोधात मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. करार वाचविण्यासाठी पंतप्रधान मे यांचे प्रयत्न सुरू असतानाच युरोपिय न्यायालयाच्या नव्या निर्णयाने ब्रिटीश सरकारला जबरदस्त झटका दिला.

सोमवारी युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसने ब्रिटीश सरकार यापूर्वीचा ‘ब्रेक्झिट’चा निर्णय फिरवू शकते, असा निकाल दिला आहे. या निकालामुळे आपल्या कराराशिवाय पर्याय नाही असे सांगणार्‍या मे सरकारची बाजू लंगडी पडली असून कराराला विरोध करणार्‍यांचा आवाज अधिकच तीव्र झाला आहे. संसदेतील मतदानाला 24 तास उरले असताना युरोपियन न्यायालयाचा आलेला निकाल महासंघासाठीदेखील झटका असल्याचे मानले जाते.

याच पार्श्‍वभूमीवर ‘ब्रेक्झिट’चे समर्थक व वरिष्ठ नेते इयान डंकन स्मिथ यांनी ब्रिटनमध्ये फ्रान्सप्रमाणे हिंसाचार भडकेल, असे बजावले आहे. ‘ब्रेक्झिट नाकारून पुन्हा एकदा जनतेचे मत जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास यापूर्वी ब्रेक्झिटसाठी मतदान केलेल्या मोठ्या वर्गात विश्‍वासघाताची भावना तयार होईल व हा संतापलेला वर्ग कोणत्याही प्रकारची पावले उचलू शकतो. फ्रान्समध्ये घडणार्‍या घटना पाहिल्या तर ब्रिटनही त्यापासून फारसा दूर नाही, हे लक्षात घ्यायला हवे’, असा इशारा स्मिथ यांनी दिला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info