जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४० जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४० जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी चढविलेल्या भ्याड हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४० जवान शहीद झाले आहेत. जम्मूमधून श्रीनगरला चाललेल्या या ताफ्यामध्ये ७० वाहनांचा व २५०० हून अधिक जवानांचा समावेश होता. पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर हायवेवर हा भयंकर आत्मघाती हल्ला चढविण्यात आला. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली असून या हल्ल्यामागे असलेल्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडविण्याची मागणी सुरू झाली आहे.

गुरुवारी जम्मू-श्रीनगर हायवेवरून चाललेल्या ‘सीआरपीएफ’च्या या पथकावर दुपारी ३.३० च्या सुमारास हा आत्मघाती हल्ला झाला. यासाठी सुमारे १०० किलो स्फोटके वापरण्यात आली. या स्फोटकांनी भरलेली कार ‘सीआरपीएफ’च्या वाहनावर आदळवून त्याचा स्फोट घडविण्यात आला. या भयंकर स्फोटात ४० जण शहीद झाले असून ही संख्या वाढेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. हा गेल्या १५ वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये झालेला सर्वात भयंकर हल्ला ठरतो. ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानात मुख्यालय असलेल्या दहशतवादी संघटनेने सदर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ‘जैश’चा दहशतवादी ‘अदिल अहमद दार’ या व्हिडिओत आपल्या हल्ल्याची माहिती देत असल्याचे दिसते.

‘जैश’चा प्रवक्ता मोहम्मद हसन याने ‘सीआरपीएफ’चे खूप मोठे नुकसान झाले असे सांगून यावर आनंद व्यक्त करीत असल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी संघटना भारताला धडा शिकविण्याची भाषा करीत होत्या. दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याची सूचनाही गुप्तचर विभागाकडून मिळाली होती. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षादलांनी हाती घेतलेल्या आक्रमक मोहिमेला या दहशतवादी हल्ल्याद्वारे प्रत्युत्तर देण्यात आल्याचे समोर येत आहे.

या हल्ल्यानंतर ‘जम्मू-श्रीनगर हायवे’ बंद करण्यात आला असून या मार्गाचे नियंत्रण ‘सीआरपीएफ’ने आपल्या हाती घेतले आहे. तसेच दहशतवाद्यांच्या विरोधात व्यापक शोधमोहीम छेडण्यात आली आहे. त्याचवेळी या हल्ल्याच्या चौकशीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ मिळाल्यानंतरच ‘सीआरपीएफ’ची वाहने पुढे निघाली होती, अशी माहिती दिली जात आहे. अशा परिस्थितीत १०० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यापर्यंत पोहोचू कसे शकते, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

सदर हल्ल्याची माहिती कळताच, देशभरात संतापाची लाट उसळली. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत असतानाच, या दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्याची मागणी देशभरात तीव्र झाली आहे. सदर हल्ल्यानंतर ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते लवकरच जम्मू-काश्मीरसाठी रवाना होणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी सदर हल्ल्याबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info